भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : महासभेपुढे येणाऱ्या विषयांसंदर्भातील प्रशासनाची भूमिका स्पष्ट करणारा गोषवारा वेळेवर सादर करा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा मिरा-भाईंदर महापालिका आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिला आहे. विभागप्रमुख विषयाशी संबंधित गोषवारा वेळेवर देत नसल्याने नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
महापालिका कामकाजाशी संबंधित विविध विषय मान्यतेसाठी अथवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महासभेपुढे येत असतात. महासभेत त्यावर चर्चा होऊन ठराव संमत केले जातात. महासभेपुढे आलेल्या विषयासोबत सदस्यांच्या माहितीसाठी गोषवारादेखील दिला जात असतो. संबंधित विषयावर प्रशासनाची भूमिका कात आहे, हे गोषवाऱ्यात नमूद केलेले असते. सर्व नगरसेवकांना विषयपत्रिका महासभेच्या आठ दिवस अगोदर दिली जाते. त्यासोबत असलेल्या प्रशासनाच्या गोषवाऱ्यामुळे नगरसेवकांना त्या विषयावर अभ्यास करून महासभेत त्यावर चर्चा करणे शक्य होते; मात्र अनेकदा काही महत्त्वाच्या विषयांवरचे गोषवारे संबंधित विभागप्रमुखांकडून वेळेत दिले जात नाहीत तर काहीवेळा महासभा सुरू झाल्यावर ते दिले जातात. परिणामी, नगरसेवकांना विषयाचा अभ्यास करणे कठीण जाते. ही बाब वारंवार होऊ लागली असल्याने नगरसेवकांनी याची तक्रार आयुक्तांकडे केली. त्याची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली आहे. विभागप्रमुख महापालिका सचिवांकडे वेळेवर गोषवारा देत नसल्याने तो नगरसेवकांना देता येत नाही. ही बाब कार्यालयीन कामकाजास अनुसरून नाही. यासाठी सर्व विभागप्रमुखांनी तातडीचे प्रकरण वगळता अन्य विषयांचा गोषवारा आयुक्तांच्या मान्यतेसाठी किमान १५ दिवस आधी सादर करावा, जेणेकरून सचिवांना तो विषयपत्रिकेसोबत जोडून नगरसेवकांना देता येईल. याचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या विभागप्रमुखांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.