मुंबईत पाण्याचे संकट; गोवंडीत लाखो लिटर पाणी वाया
चेंबूर, ता. १५ (बातमीदार) ः मुंबईत शुक्रवारपासून १० टक्के पाणीकपातीला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे गोवंडीमध्ये पालिका प्रशासनाच्या हलगर्जीमुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गोवंडी येथील बोरबादेवी मंदिरासमोर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान पालिकेची जलवाहिनी फुटली असून, तब्बल आठवडाभर उलटूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. धरण क्षेत्रातील पाणीसाठा कमी झाल्याने मुंबईत १० टक्के पाणीकपात सुरू झाली आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात असताना सुरू असलेली पाण्याची उधळपट्टी ही प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेचे उदाहरण असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, रस्ता रुंदीकरणाच्या कामावेळी खोदकाम करताना जलवाहिनीला धक्का लागून ती फुटली. त्यानंतर मोठ्या दाबाने पाणी रस्त्यावर वाहू लागले. परिसरातील नागरिकांनी अनेकदा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे सामान्य रहिवाशाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जर सामान्य नागरिकांनी पाण्याचा अपव्यय केला तर दंड आकारला जातो, मग या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल स्थानिक रहिवाशांचा आहे.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून जलवाहिनीची दुरुस्ती करावी आणि होत असलेला पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. तसेच या प्रकारासाठी जबाबदार ठेकेदार आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सेव्ह व नेस्ट संस्थेच्या अध्यक्षा स्वानंदी सोलकर यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.