चर्चेपासून कृतीकडे!
‘मुंबई क्लायमेट वीक २०२७’ची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः ‘मुंबई क्लायमेट वीक’चे दुसरे पर्व मुंबईत २२ ते २६ फेब्रुवारी २०२७ दरम्यान रंगणार आहे. हवामान बदलाच्या प्रश्नांवर जागतिक स्तरावरील चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा संगम घडवून आणणाऱ्या ‘मुंबई क्लायमेट वीक’चे पहिले पर्व नुकतेच पार पडले. त्याचा आउटकम अँड इम्पॅक्ट अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ही घोषणा करण्यात आली.
प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात असून, मुंबई महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे यजमान संस्थांमध्ये सहभागी आहेत. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकार आणि पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. नागरिकाभिमुख आणि प्रगतीशील हवामान उपाययोजना उभारण्यावर आमचा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘मुंबई क्लायमेट वीक २०२६’च्या तीन दिवसांच्या या उपक्रमात शहरी लवचिकता, अन्न व्यवस्था आणि ऊर्जा संक्रमण या तीन प्रमुख विषयांवर केंद्रित चर्चा झाली. सरकार, वित्तीय संस्था, उद्योग समूह, संशोधक, नवोन्मेषक, नागरी संस्था, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक समुदाय अशा विविध स्तरांतील घटक एकाच व्यासपीठावर आले. या उपक्रमात ३० हून अधिक देशांतील चार हजारांपेक्षा अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या उपक्रमातून सात सामंजस्य करार करण्यात आले, तर दहापेक्षा अधिक धोरणात्मक साधने आणि उपक्रम सुरू करण्यात आले.
----------------
विविध मान्यवरांचा सहभाग
‘मुंबई क्लायमेट वीक २०२६’मध्ये १०० हून अधिक हवामान उपाययोजनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. उष्णतेशी मुकाबला करणाऱ्या उपाययोजना, सौरऊर्जा, पुनरुत्पादक शेती, कचऱ्याचे पुनर्वापर तंत्र, शहरी जंगल, कूल रूफ्स, हवामान अर्थसंकल्प यांसारख्या संकल्पनांना विशेष प्रतिसाद मिळाला. ‘मुंबई क्लायमेट वीक इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये ग्लोबल साऊथमधील ३५० हून अधिक अर्जदारांनी सहभाग घेतला. या उपक्रमात माजी अमेरिकन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, अंतराळवीर राकेश शर्मा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह विविध क्षेत्रांंतील मान्यवर सहभागी झाले होते.
---------------
‘मुंबई क्लायमेट वीक २०२७’मध्ये नागरिकांचा अधिक व्यापक सहभाग, जनजागृती आणि स्थानिक स्तरावरील हवामान कृतीवर भर दिला जाणार आहे. हवामान बदलावर चर्चा करण्यापासून प्रत्यक्ष उपाययोजनांकडे वाटचाल करणे, हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- शिशिर जोशी, संस्थापक, प्रोजेक्ट मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.