मनाचा गुंता सोडवणारा डॉक्टर पडद्याआड
डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ ः साध्यासोप्या भाषेत मनाची गुंतागुंत सोडवण्यासाठी आपले अख्खे आयुष्य समर्पित करणारे प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, लेखक, नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आज जगाचा निरोप घेतला. मुंबईतील खासगी रुग्णालयात स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत असताना त्यांना अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास होऊन कार्डियाक अटॅक आला. त्यामुळे पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ६८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सविता आणि मुलगा कबीर असा परिवार आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी हे मूळचे ठाणेकर होते. ज्या काळी मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्यासाठी लोक घाबरायचे, टाळायचे त्या काळात मानसिक आजाराचा फार बाऊ न करता तो अन्य आजारांपैकीच एक असल्याचे त्यांनी पटवून दिले. म्हणूनच या ठाणेकर मानसोपचारतज्ज्ञाची कीर्ती सर्वदूर पोहोचली. डॉ. नाडकर्णी यांनी १९८०मध्ये एमएमबीएस आणि १९८४मध्ये मनोविकासशास्त्रामध्ये एमडी ही पदवी मिळवली. मुंबईच्या सेठ जे. एस. मेडिकल कॉलेज आणि के.ई.एम. हॉस्पिटलमधून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. मुंबई विद्यापीठाच्या एमडी परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. सुरुवातीच्या काळात के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर, १९८६मध्ये त्यांनी स्वतंत्र सेवा द्यायला सुरुवात केली. व्यवसायात असताना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मनोविकाराला लाजिरवाणी बाब समजत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी एक चळवळच उभी केली. त्यासाठी त्यांनी १९९०मध्ये आयपीएच अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची स्थापना केली. तीव्र मानसिक आजारांवर उपचार एवढ्यावर मर्यादित न राहता त्यांनी मनोरुग्ण, त्यांचे कुटुंबीय यांना आधार देत मनोधैर्य वाढवू इच्छिणाऱ्यांना मदतीचा हात देण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून सुरू केले. त्याआधी त्यांनी १९८६मध्ये ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र’ स्थापन करण्यात मदत केली होती.
...
हजारोंच्या आयुष्याला नवे वळण देणारे प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या जाण्यामुळे मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखे कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस