पुराचा ४२ गावांना धोका
शहापूरमधील सर्वाधिक २२ गावे; उपाययोजनांसाठी यंत्रणा सतर्क
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : माॅन्सून काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील मॉन्सूनपूर्व परस्थितीचा आढावा घेत, त्या पार्श्वभूमीवर खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत. जिल्ह्यातील तब्बल ४२ गावे संभाव्य पूरप्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जात आहेत. यामध्ये शहापूर तालुक्यातील सर्वाधिक २२ गावांचा समावेश आहे.
अतिवृष्टी, धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग, नद्यांच्या वाढणाऱ्या पाणीपातळ्या आणि सखल भागांतील वसाहती यामुळे या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांना पुराचा फटका बसतो. विशेषतः उल्हास, भातसा, काळू आणि बारवी नदी परिसरातील गावांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडतात. यामुळे नागरिकांचे स्थलांतर, शेतीचे नुकसान, वाहतूक विस्कळित होणे आणि जनजीवन ठप्प होण्याच्या घटना वारंवार समोर येतात.
हीच बाब लक्षात घेऊन यंदा प्रशासनाने पूर्वतयारीवर भर दिला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन आराखडा सक्रिय करण्यात आला असून, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, पोलिस, अग्निशमन आणि सार्वजनिक बांधकाम विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येत असून, २४ तास आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. पूरप्रवण गावांमध्ये बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड, आपत्कालीन औषधे, जनरेटर आणि तात्पुरत्या निवारा केंद्रांची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. शाळा, ग्रामपंचायत कार्यालये आणि सामुदायिक सभागृहांमध्ये तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शहापूर तालुक्यातील अनेक गावे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात येत असल्याने मुसळधार पावसानंतर या भागात परिस्थिती अधिक गंभीर बनते. त्यातच धरणांमधून विसर्ग सुरू करण्यापूर्वी गावांना सतर्कतेचे संदेश देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समित्यांनाही सक्रिय करण्यात आले असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. पूरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेता ठाणे जिल्हा प्रशासनाने यंदा ‘पूर्वतयारी आणि तातडीचा प्रतिसाद’ यावर विशेष भर दिला असून, कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.
पुराचा धोका असणारी गावे
तालुका गावांची संख्या
-शहापूर २२
-मुरबाड ९
-उल्हासनगर ५
-कल्याण ६