जव्हार, ता. २२ (बातमीदार) : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेंतर्गत वावर-वांगणी ग्रामपंचायतीतील सागपाणी व रिठीपाडा येथे सुरू असलेली पाणीपुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लाखोंचा निधी खर्च होऊनही योजना अद्याप पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, योजनेंतर्गत विहीर, पाण्याची टाकी व पाइपलाइनची कामे अनेक ठिकाणी अपूर्ण आहेत. अनेक घरांपर्यंत नळजोडणी पोहोचलेली नसून नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. परिणामी, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. सध्या दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
निधीअभावी कामे खाेळंबली
यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे अभियंता ललित बोराडे यांच्याशी संपर्क साधला असता, निधीअभावी केवळ जव्हार तालुक्यातच नव्हे तर राज्यभरातील जलजीवन मिशनची अनेक कामे तात्पुरती बंद असल्याचे त्यांनी सांगितले. निधी उपलब्ध झाल्यानंतर कामांना पुन्हा गती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संबंधित योजनेचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण आहेत. रखडलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, तसेच नागरिकांना तातडीने शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- विनोद बुधर, सरपंच, वावर-वांगणी ग्रामपंचायत
जव्हार : तालुक्यात ‘जलजीवन मिशन’ची कामे रखडल्याने पाणीटंचाई जाणवत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.