क्रीडा संकुलात बेकायदा बोअरवेल खोदकाम
मुख्य सूत्रधारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची नगराध्यक्षा भावना घाणेकर यांची मागणी
उरण, ता. २२ (बातमीदार) ः उरण नगर परिषदेच्या मालकीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल परिसरातील तरण तलावासाठी (स्विमिंग पूल) बेकायदा बोअरवेलचे खोदकाम हाती घेतले होते. हे काम रंगेहाथ पकडण्यात आले असून नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच, दोषींवर कठोर फौजदारी कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
क्रीडा संकुल परिसरात अनधिकृतपणे बोअरवेल खोदकाम सुरू असल्याची माहिती काही नगरसेवकांकडून भावना घाणेकर यांना मिळाली. त्यांनी तातडीने यासंदर्भात परवानगीबाबत मुख्याधिकारी जीवन पाटील आणि कार्यालय अधीक्षक राजेंद्र घाडगे यांच्याकडे विचारणा केली. प्रशासनाकडून या कामाला कोणतीही परवानगी दिलेली नाही, अशी लेखी माहिती मिळताच नगराध्यक्षांनी कार्यालय अधीक्षकांना तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. या वेळी माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, नगरसेवक मंगेश कासारे, नगरसेविका नाहिदा ठाकूर, नगरसेविका प्रार्थना म्हात्रे आदी उपस्थित होते. दरम्यान, याप्रकरणी संबंधितांवर उरण पोलिस ठाण्यात तत्काळ लेखी तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
सुट्टीचे दिवस साधून चोरट्या पद्धतीने खोदकाम
१ शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असल्याने तसेच नगर परिषदेचे सर्व वरिष्ठ अधिकारी शहराच्या बाहेर वास्तव्यास असल्याचा गैरफायदा घेऊन, चोरट्या पद्धतीने हे काम केले जात होते. नगराध्यक्षांच्या आदेशानंतर पालिकेचे वरिष्ठ लिपिक प्रमोद मटकर यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
२ त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान एका गाडीद्वारे हे खोदकाम सुरू असल्याचे रंगेहाथ पकडण्यात आले. यादरम्यान घटनास्थळी लेखापाल सुरेश पोसतांडेल, वरिष्ठ लिपिक प्रमोद मटकर व संतोष पवार उपस्थित होते.
३ चौकशीत घटनास्थळी उपस्थित कंत्राटदार व कामगारांनी विनोद रूपचंदानी यांच्या सांगण्यावरून काम करीत असल्याची कबुली दिली.
फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
भावना घाणेकर म्हणाल्या, नगर परिषदेच्या जागेत आणि क्रीडा संकुलासारख्या सार्वजनिक मालमत्तेत असा बेकायदा कारभार खपवून घेतला जाणार नाही. क्रीडा संकुलाच्या ठेकेदाराकडे लाखो रुपयांची थकबाकी असताना, तसेच ठेक्याची मुदतवाढ न घेता असे करणे म्हणजे नगर परिषदेच्या अस्तित्वाला आव्हान आहे. संबंधित कंत्राटदार व मुख्य सूत्रधारांवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झालीच पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.