नवी मुंबईत एसटी प्रवाशांची परवड
शहरात एकही एसटी डेपो नाही
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) ः नियोजनबद्ध, आधुनिक आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत आजही राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) एकही डेपो नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे. सिडकोने शहराची उभारणी सुरू करून जवळपास पाच दशके पूर्ण झाली, तर महापालिकेलाही तीन दशकांहून अधिक काळ लोटला; परंतु लाखो एसटी प्रवाशांसाठी एका डेपोची आणि मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याची तीव्र टीका नागरिकांमधून होत आहे.
सध्या नवी मुंबईतील एकमेव एसटी डेपो म्हणून ओळखली जाणारी तुर्भे येथील जागा प्रत्यक्षात ट्रक टर्मिनलमध्ये रूपांतरित झाली आहे. त्यामुळे एसटी बसांच्या देखभाल, पार्किंग व प्रवासी सुविधांचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातून दररोज हजारो नागरिक मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ तसेच राज्यातील विविध भागांत प्रवास करतात; मात्र त्यांना बसची प्रतीक्षा करताना उन्हाचा, पावसाचा आणि वाहतुकीच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
दरम्यान, नवी मुंबईची लोकसंख्या १६ लाखांच्या पुढे गेली असून शहराचा विस्तार पनवेल, उरण आणि तळोजा परिसरापर्यंत झाला आहे. एवढ्या मोठ्या नागरी क्षेत्रात एसटी डेपो नसणे, ही गंभीर बाब मानली जात आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या एसटीसेवेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
बसथांब्यांवर सुविधांचा अभाव
सायन-पनवेल महामार्ग तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीबीडी बेलापूर आणि तळोजा परिसरातील एसटी थांब्यांवर प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा नाहीत. अनेक ठिकाणी निवारा शेड अपुरे आहेत, तर काही ठिकाणी त्यांची दुरवस्था झाली आहे.
शौचालयांची दुरवस्था
प्रवाशांसाठी स्वच्छ व कार्यरत शौचालये उपलब्ध नसणे, ही एक गंभीर समस्या आहे. जुईनगर येथील मोबाईल शौचालय बंदावस्थेत असल्याचे दिसून येते. सानपाडा परिसरात शौचालयाची कोणतीही व्यवस्था नसल्याची तक्रार आहे. नेरूळ आणि सीबीडी बेलापूर येथील सुविधा अपुऱ्या असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
बसथांब्यांवर अतिक्रमण
अनेक एसटी थांब्यांवर खासगी वाहने, ट्रॅव्हल्स आणि रिक्षांचे अतिक्रमण वाढल्याने प्रवाशांना सुरक्षितपणे उभे राहण्यासाठीही जागा मिळत नाही. काही ठिकाणी बसथांबे पार्किंगमध्ये बदलल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बस येताना प्रवाशांना रस्त्यावर उतरून बस पकडावी लागते, यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे.
नागरिकांची मागणी
नागरिक आणि प्रवासी संघटनांनी नवी मुंबईत तातडीने आधुनिक एसटी डेपो उभारण्याची मागणी केली आहे. यासोबतच प्रमुख बसथांब्यांवर निवारा शेड, स्वच्छ शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा, बस वेळापत्रक फलक आणि अतिक्रमणमुक्त परिसर उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.