पनवेलच्या पाणीप्रश्नी उच्च न्यायालयात धाव
अतिरिक्त पाण्यासाठी विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांची याचिका
पनवेल, ता. २२ (बातमीदार) : पनवेल पालिका क्षेत्रातील पाणीटंचाईच्या प्रश्नावरून आता सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष थेट न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा अपुरा पुरवठा या पार्श्वभूमीवर, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, गटनेते केतन भगत, काँग्रेसचे नगरसेवक हरेश केणी आणि तुषार पाटील यांनी शुक्रवारी (ता. १९) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मोरबे धरणातून पनवेलला ३० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळावे, ही या याचिकेतील प्रमुख मागणी आहे.
अरविंद म्हात्रे यांनी सांगितले की, पनवेलचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. मात्र, आजही शहरातील अनेक भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असून नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मोरबे धरणातून पनवेल महापालिकेला ३० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळावे, या प्रमुख मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
म्हात्रे यांनी या वेळी सत्ताधारी भाजपवरही टीका केली. या गंभीर प्रश्नावर प्रभावी पाठपुरावा करण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याने न्यायालयाची पायरी चढावी लागल्याचे त्यांनी म्हटले. यापूर्वी मोरबे धरणातून नवी मुंबईकडे जाणारी जलवाहिनी बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री स्तरावर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप अशी कोणतीही बैठक झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पाणी परिषद केवळ कागदावरच? महापौरांना जाब
पनवेल महापालिकेच्या पहिल्याच महासभेत महापौरांनी १५ दिवसांत पाणी परिषद आयोजित करण्याची घोषणा केली होती. मात्र, आजपर्यंत अशी परिषद घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पाणी परिषद का घेण्यात आली नाही, याचा जाबही अरविंद म्हात्रे यांनी महापौरांना विचारला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.