वाशीत मिक्सर ट्रक
थेट इमारतीत घुसला
अरुंद रस्त्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ : वाशी सेक्टर ९ येथे एका पुनर्विकास प्रकल्पाच्या साइटवरून निघालेला काँक्रीट मिक्सर ट्रक शेजारच्या ‘जेएन-४’ या गृहनिर्माण संकुलात घुसल्याची घटना सोमवारी घडली. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत काेणतीही अनुचित घटना घडली नसली तरी दाट लोकवस्तीतील अरुंद रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दुर्घटनाग्रस्त मिक्सर ट्रक ‘जेएन-२’ वसाहतीच्या ठिकाणाहून निघाला होता. अरुंद असलेल्या रस्त्यावरून ट्रक मागे घेऊन चढणीवर आणण्याचा प्रयत्न चालक करत होता. या वेळी ब्रेक निकामी हाेऊन चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक शेजारच्या ‘जेएन ४’ संकुलात जाऊन धडकला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. ‘जेएन ४’ गृहनिर्माण संस्थेचे सचिव विनय तलाटी यांनी सांगितले की, हा रस्ता अत्यंत अरुंद असून, येथे बांधकामाशी संबंधित अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. जिथे आवश्यक असेल तिथे विकसकांनी रस्ते रुंद करावेत आणि नागरी प्रशासनानेही सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करावी. अन्यथा अशा प्रकारचे जीवघेणे अपघात इतर पुनर्विकास प्रकल्पांच्या ठिकाणीही घडू शकतात, अशी भीती पर्यावरण कार्यकर्ते आणि ‘ह्युमन चेन ऑनलाइन मंचा’चे समन्वयक बी. एन. कुमार यांनी व्यक्त केली.
------
...तर अनर्थ झाला असता!
‘जेएन-४’ संकुल परिसरातून विजेच्या केबल आणि गॅसवाहिनी गेली आहे. या ट्रकचा गॅसवाहिनी किंवा विजेच्या तारांना धक्का लागला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती. माझे स्वयंपाकघर या रस्त्याच्या दिशेला असून, अवजड वाहनांची वर्दळ पाहून नेहमीच भीती वाटते, असे रहिवासी विभा स्युनरी यांनी सांगितले.