छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविणार!
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अभियान समितीची बैठक
पनवेल ता. २२ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी, विविध विभागांमधील समन्वय आणि व्यापक जनसहभाग सुनिश्चित करण्यासाठी राज्य समन्वयक आमदार विक्रांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. या समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी (ता. २२) विधान भवन येथे पार पडली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अभियानाच्या पुढील वाटचालीसंदर्भात सविस्तर व धोरणात्मक चर्चा करण्यात आली.
विधान भवनातील कामकाज सल्लागार समिती कक्षात आयोजित केलेल्या बैठकीत अभियानाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची रणनीती तसेच राज्यातील नागरिकांचा अधिकाधिक सहभाग कसा वाढविता येईल, यावर विचारमंथन करण्यात आले. विक्रांत पाटील यांनी अभियानाच्या आगामी टप्प्यांची माहिती देत राज्यभर प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा सादर केला. तसेच अभियान अधिक परिणामकारक करण्यासाठी विविध स्तरांवरील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सामाजिक घटक यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या बैठकीस विधान परिषदेच्या माजी उपसभापती तथा आमदार नीलम गोऱ्हे यांच्यासह आमदार प्रमोद जठार, माधवी नाईक, प्रज्ञा सातव, प्रवीण दरेकर, सुनील कर्जतकर, श्रीकांत भारतीय, हेमंत पाटील, संजय भेंडे आणि विवेक कोल्हे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर आमदार प्रसाद लाड आणि योगेश टिळेकर यांनी सहभाग नोंदविला.
बैठकीत उपस्थित सदस्यांनी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध सूचना मांडल्या. राज्यभर महसूल विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला अधिक लोकाभिमुख स्वरूप देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रशासकीय उपक्रम लोकचळवळ बनावी
महसूलमंत्री बावनकुळे यांनी अभियान हे केवळ प्रशासकीय उपक्रम न राहता लोकचळवळ बनावे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता व्यक्त केली. राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत अभियानाचा लाभ पोहोचावा यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.