खारघरमधील गृहनिर्माण प्रकल्पात महिलांचा बिल्डरला घेराव
खारघर, ता. २२ (बातमीदार) ः अप्पर खारघरमधील एका मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये रहिवासी महिलांनी पाणी समस्या आणि इतर प्रलंबित प्रश्नांवरून बिल्डरविरोधात तीव्र संताप व्यक्त करत थेट घेराव घातल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, त्यामध्ये काही संतप्त महिला बिल्डरच्या वाहनाला अडवून जाब विचारताना स्पष्ट दिसत आहेत.
अप्पर खारघरमध्ये बिल्डरांनी रोहिंजन परिसरातील खारघर ओवे डोंगराच्या सान्निध्यात शेतकऱ्यांच्या जमिनीवर टू, थ्री बीएचके घरे उभारून अप्पर खारघर हे नाव देवून घरांची विक्री करत आहे. मात्र, येथे कोट्यवधी रुपये देऊन हक्काचे घर घेणाऱ्या रहिवाशांना आता मूलभूत सुविधांसाठीच संघर्ष करावा लागत आहे. सोमवारी (ता. २२) या गृह प्रकल्पाचे संचालक प्रकल्पाच्या ठिकाणी आले असता, तीव्र पाणी समस्येमुळे संतप्त झालेल्या महिलांनी एकत्र येत त्यांना गाठले. रहिवाशांच्या मागण्या आणि सुविधांबाबतच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत महिलांनी संबंधित बिल्डरचे वाहन मध्यरस्त्यात अडवले. महिलांनी पाण्याचा प्रश्न लावून धरत घोषणाबाजी सुरू करताच, संबंधित संचालकाने रहिवाशांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले व काहीही न बोलता वाहनात बसून निघून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यामुळे गृहनिर्माण संकुलाच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या प्रकरणाबाबत बिल्डर व्यवस्थापनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. संबंधित तक्रारींची दखल घेऊन रहिवासी आणि बिल्डर यांच्यात लवकरात लवकर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.