नवी मुंबईच्या ५,५७५ कोटींच्या मेट्रो प्रकल्पास मंजुरी
नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवी मुंबई मेट्रो मार्गिका-१अ (बेलापूर ते सागर संगम) आणि मार्गिका २ (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टि-४) या पाच हजार ५७५ कोटी खर्चाच्या मेट्रो प्रकल्प अहवालास राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत हा प्रकल्प राबवला जाणार असून, कालबद्ध कार्यक्रम १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश एमएमआरसीएल व सिडकोला देण्यात आले आहेत.
नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येची भविष्यातील गरज लक्षात घेऊन सर्वसमावेशक वाहतूक अभ्यासानुसार (सीटीएस) या नवीन मेट्रो मार्गिकांचे नियोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई मेट्रो मार्गिका १च्या विद्यमान तिकीटदरांच्या आधारे, पुढील मार्गिकांसाठी नवीन भाडे संरचना निश्चित करण्यात आली आहे. दरवर्षी पाच टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. सध्याच्या रचनेनुसार ० ते २ किमीसाठी १० रुपये, तर १० किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी कमाल ४० रुपये तिकीट दर आकारले जातात. मेट्रो रेल्वे प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी आर्थिक व्यवहार्यता तपासून यात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शासनाच्या पूर्व मान्यतेने एमएमआरसीएलला देण्यात आले आहेत. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीच्या कार्यकक्षेत हा प्रकल्प आणण्यात आला आहे.
नागरी परिवहन निधीची होणार निर्मिती
प्रकल्पाच्या कर्जाची परतफेड आणि देखभाल-दुरुस्तीसाठी नागरी परिवहन निधी उभारण्यात येणार आहे. मार्गिकांच्या दोन्ही बाजूला ५०० मीटर अंतरापर्यंत अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक देऊन त्यातून मिळणाऱ्या अधिमूल्याची ५० टक्के रक्कम, मालमत्ता विकास, स्थानकांवरील कमर्शियल किऑस्क, एटीएम आणि ब्रँडिंग/जाहिरातींतू मिळणारे उत्पन्न या निधीत जमा केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.