परळ स्थानकातील शौचालय कुलूपबंद; प्रवाशांचे हाल
धारावी, ता. २३ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या परळ स्थानक परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले निशुल्क आधुनिक शौचालय गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत असून, रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
परळ स्थानक हे केईएम, वाडिया, टाटा आणि महात्मा गांधी रुग्णालयांकडे जाण्यासाठी महत्त्वाचे स्थानक आहे. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येथे ये-जा करतात. तसेच परिसरातील महाविद्यालये आणि शाळांमध्ये जाणारे विद्यार्थीही या स्थानकाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. ट्रेनमधून उतरल्यानंतर अनेक प्रवासी नैसर्गिक विधीसाठी या शौचालयाचा वापर करीत असतात.
मात्र शौचालय बंद असल्याने विशेषतः मधुमेहासह विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लघुशंकेसाठी शौचालयाकडे गेल्यानंतर ते बंद असल्याचे दिसल्याने अनेकांना नाइलाजाने परतावे लागत आहे. त्यामुळे शारीरिक तसेच मानसिक गैरसोय वाढत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
दरम्यान, पालिकेच्या कामामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्याने शौचालय बंद ठेवावे लागल्याचे परळ स्थानकाचे स्थानक प्रबंधक सिद्दीकी मो. अस्लम यांनी सांगितले. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतरच शौचालय सुरू करता येईल, मात्र ते नेमके कधी सुरू होईल याबाबत सध्या निश्चित माहिती देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शौचालय पुन्हा सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.