मुंबई

पालघरमध्ये पावसाला प्रारंभ;

CD

पावसाच्या प्रतीक्षेला पूर्णविराम
जिल्ह्यात जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
पालघर/कासा/जव्हार, ता. २३ ः जिल्ह्यात पावसाने दीर्घ प्रतीक्षेनंतर हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत हलक्या तसेच मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्याने उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला.
पालघर, तलासरी, डहाणू, विक्रमगड, वाडा, जव्हार तालुक्यात एक ते चार मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर वसई तालुक्यात तुरळक पाऊस होता. काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या, तर काही भागांत रिमझिम पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला, पण डोंगराळ तसेच आदिवासी पट्ट्यात काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले. या भागात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उकाडा अधिक जाणवत आहे. त्यामुळे पाऊस सुरू झाला असला तरी उष्णतेचा त्रास पूर्णपणे कमी झालेला नाही.
-----------------------------------
शेतकऱ्यांमध्ये उत्साह
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या भातपिकाखाली ७५ हजार हेक्टरच्या लागवडीखालील क्षेत्र असून, अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, सध्या झालेला पाऊस पेरणीसाठी पुरेसा नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. पुढील काही दिवस सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
तसेच पावसाने दडी मारली, तर पेरलेले बियाणे वाया जाण्याचा धोका असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
-------------------------
पाणीटंचाईचे सावट कायम
जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी नदी, नाले आणि धरणांच्या पाणीसाठ्यात अद्याप लक्षणीय वाढ झालेली नाही. सातत्यपूर्ण पावसाची गरज कायम आहे. पुढील काही दिवसांत मॉन्सून सक्रिय झाला तरच शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट अजूनही जिल्ह्यावर कायम आहे.
---------------
नगर परिषदेची पोलखोल
- पालघर शहरात पावसाच्या हजेरीने नगर परिषदेच्या पाणी निचरा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले. शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले, तर अनेक ठिकाणी चिखल पसरलेला होता.
- पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, गटारांची दुरुस्ती, पाणी निचऱ्यासाठी लाखो रुपयांचा खर्च प्रशासनाने केला होता. मात्र, पहिल्याच पावसात रस्त्यांवरील चिखलाने दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांनाही मनस्ताप झाला.
-------------------------
शेतीच्या कामांची लगबग
पहिल्याच पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. लहान मुलांनीही पावसाचा मनमुराद आनंद घेत पावसात क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्येही नवचैतन्य संचारले आहे. सलग चार ते पाच दिवस समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतीची नांगरणी, भातपेरणीला सुरुवात करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
-------------------------
रोजगार मिळणार
आदिवासीबहुल जव्हार तालुक्यात शेती मुख्य व्यवसाय आहे. खरीप हंगामात शेती, मजुरीद्वारे भागातील नागरिकांना रोजगार मिळतो. पण, यंदा पाऊस उशिरा आल्याने शेतकरी विवंचनेत होता. अखेर जूनच्या अखेरीस वरुणराजा बरसल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाच्या हजेरीने येथील शेतकरी सुखावला आहे. मृगाचे नक्षत्र सुरू झाल्यापासून झालेल्या मॉन्सूनने मंगळवारी (ता. २३) अखेर जव्हार तालुक्यात ठिकठिकाणी हजेरी लावली.

विश्वास नागरे पाटील यांची बदली, 'या' जिल्ह्याच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

स्टार प्रवाहच्या आठ मालिकांना आव्हान द्यायला येतायत झी मराठीचे २ नवे मोहरे; टीआरपीमध्ये कोण मारणार बाजी?

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार... पण कधी? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं मोठं अपडेट

Rohit Sharma Receives Padma Shri Award: रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

लोकप्रियता, पैसे सगळं आहे तरीही प्राजक्ता माळीचं 'हे' स्वप्न अजूनही आहे अपूर्ण; म्हणते, 'मला मुंबईत...'

SCROLL FOR NEXT