मुंबई

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशीही सरकारने केलेली प्रतारणा

CD

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशीही सरकारने केलेली प्रतारणा
१९८४ च्या आंदोलनातील रणरागिणी भारती पोवार यांचे रोखठोक मत
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अद्यापि लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव अधिकृतपणे न देणे ही केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे, तर १९८४ च्या आंदोलनात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांशी सरकारने केलेली मोठी प्रतारणा आहे, असे रोखठोक आणि भावुक मत उरणच्या ऐतिहासिक शेतकरी लढ्यातील अग्रभागी असलेल्या रणरागिणी भारती पोवार यांनी व्यक्त केले. दि. बा. पाटील यांच्या २५ जून रोजी असलेल्या पुण्यतिथीनिमित्त दिबांना अभिवादन करण्यासाठी त्या कोल्हापूरवरून उरणमध्ये आल्या असता जसखार येथे पत्रकारांशी बोलत होत्या.
भारती पोवार म्हणाल्या की, १९८४ च्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व दि. बा. पाटील करत होते. ते आंदोलन शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा म्हणून होते. दि. बा. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सरकारने तुरुंगात डांबले. त्या वेळी दिबांचा मला आदेश आला, तुम्ही तातडीने निघून या. तेव्हा मी २३ वर्षांची होती. त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून मी तान्ह्या बाळाला घरी सोडून कोल्हापूर येथून तडक निघून जासईला आले. त्या वेळी आंदोलनात सहभागी होण्यासाठी उरणला येण्यासाठी माझ्याकडे तिकिटासाठी पैसेही नव्हते. एकाकडून शंभर रुपये उसणे घेऊन आले. पाहते तर परिसरातील गावे ओस पडली होती. प्रचंड पोलिसांचा फौजफाटा होता. एसआरपी बंदुका जणू रोखूनच होते, अशी भयावह परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे दिबांनी जणू काही माझ्यावर विश्वास ठेवून आंदोलनाचे नेतृत्व माझ्याकडे सोपवून पुढील परिस्थितीला सामोरे जाण्याचा आदेश दिला होता. तो कार्यकर्ती म्हणून मी स्वीकारला आणि आंदोलनाच्या तयारीसाठी गावोगावी गुप्त बैठका घेतल्या. या बैठकांमधून सरकारसमोर झुकायचे नाही. एक इंच जमिनीवरसुद्धा ताबा द्यायचा नाही, असा निर्धारच व्यक्त करण्यात आला.
१९८४ च्या त्या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्यात गावोगावच्या शेतकऱ्यांनी घरादाराला कुलप लावून एकप्रकारे घरावर तुळशीपत्र ठेवून रस्त्यावर उतरले होते. ते दिवस अंगावर काटा आणणारे आहेत, असेही भारती यांनी सांगितले.
भारती पोवार दिबांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूरवरून आल्या असता त्यांचे सारथ्य स्वतः कामगार नेते महेंद्र घरत यांनी केले. सर्वप्रथम भारती यांनी गव्हाण येथील शांतादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर उरण तालुक्यातील जसखार येथील रत्नेश्वरीचे दर्शन घेतले. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तरांचे वाटप त्यांच्या हस्ते झाले. या वेळी भारती यांनी म्हटले की, आंदोलनाला जवळ-जवळ ४२ वर्षे झाली, पण माझा सन्मान फक्त महेंद्र घरत यांनी आईच्या नावाने पुरस्कार देऊन केला. सध्या सर्वांचे भले व्हावे म्हणून विचार करणारा महेंद्र मला दिसतोय. त्याचे काम मी डोळ्यांदेखत पाहातोय. तो ग्रेट माणूस आहे. त्यानंतर त्या आंदोलनात सक्रिय असणारे पी. जे. पाटील यांची भारती आणि महेंद्र घरत यांनी सदिच्छा भेट घेतली आणि आंदोलनातील आठवणींना उजाळा दिला. पी. जे. पाटील परिवाराने यावेळी भारती यांचा साडीचोळी देऊन यथोचित सन्मान केला.

भारती पोवार गहिवरल्या
उरण परिसर पाहून भारती पोवार गहिवरल्या आणि जुन्या आठवणींत रमल्या. त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा, गावांचा, परिसराचा, डोंगररांगांचा आवर्जून उल्लेख केला. हा संपूर्ण परिसर मी पायी फिरले. अनेक जण सोबत होते. तहानभूक विसरून आंदोलन केले. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. हे सर्व महेंद्र घरत ऐकून घेऊन म्हणाले, मी त्यावेळी १२ वीला होतो. विद्यार्थिदशेत असतानाही आंदोलन सहभागी झालो होतो. माझ्या शेजारी असणाऱ्या गव्हाण कोपर येथील एका सहकारीला गोळी लागली. सगळे सैरावैरा पळत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: हुडी घातलेला तरुण सीसीटीव्हीमध्ये दिसला अन् पोलिसांचा संशय बळावला; 'असा' लागला केतन अग्रवालच्या खुन्याचा शोध

Thane Illegal Schools: प्रवेशापूर्वी सावध व्हा! ठाणे जिल्ह्यातील बेकायदा शाळांची यादी जाहीर; पालकांना प्रशासनाचा इशारा

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

Sickle Cell Test: लग्नाआधी करा 'ही' रक्त तपासणी; भविष्यात तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ठरू शकते महत्त्वाची

Latest Marathi News Live Update : वाशिमच्या मानोरा-मंगरुळपीर तालुक्यात पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT