मुंबई

आझाद मैदानात आंदोलनांचा पाऊस

CD

आझाद मैदानात आंदोलनांचा पाऊस
खेळाडूंचे धरणे, पालकांचे आमरण उपोषण, फसवणूकग्रस्तांचा एल्गार
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २४) आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी आंदोलकांचा आवाज घुमला. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असतानाही आंदोलनकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. कुणी खेळाडूंच्या हक्कांसाठी धरणे धरले, तर आपल्या चिमुकल्याला न्याय मिळावा म्हणून आई-वडील आमरण उपोषणावर बसले आहेत. शिपिंग क्षेत्रातील कथित फसवणुकीला बळी पडलेल्या युवकांनीही न्यायासाठी जनआक्रोश आंदोलन छेडले आहे.
आझाद मैदानात एका बाजूला हातात फलक घेऊन घोषणाबाजी करणारे खेळाडू, दुसऱ्या बाजूला मुलाच्या छायाचित्रासह न्यायाची याचना करणारे पालक आणि तिसऱ्या बाजूला फसवणुकीच्या आरोपांमुळे उद्ध्वस्त झालेल्या युवकांचा संताप, असे चित्र पाहायला मिळाले. पावसाच्या सरी कोसळत असतानाही विविध संघटना आणि अन्यायग्रस्त आंदोलकांनी घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विविध संघटना, कंत्राटी शिक्षक, पोलिस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी, विविध विभागांतील कर्मचारी, फसवणूकग्रस्त युवक तसेच इतर अनेक मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांमुळे आझाद मैदान परिसर दिवसभर गजबजलेला होता. अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये सरकारबद्दल नाराजी आणि संतापाचे वातावरण दिसून आले.

‘लाडकी खेळाडू योजना’साठी १,२०० खेळाडूंचे बेमुदत धरणे
महाराष्ट्रातील १,२०० हून अधिक शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि राष्ट्रीय खेळाडूंनी आझाद मैदानावर बेमुदत धरणे सुरू केले आहे. ‘मिशन २०३६ ऑलिंपिक’च्या पार्श्वभूमीवर राज्याने क्रीडा धोरणात बदल करून ‘लाडकी खेळाडू योजना’ लागू करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. राष्ट्रीय पदक विजेत्यांना आर्थिक सहाय्य, मासिक मानधन, सरकारी नोकरी, खेळाडूंना विमा, प्रशिक्षक व पंचांना मानधन तसेच क्रीडा आरक्षण वाढविण्यासह १४ मागण्या आंदोलनकर्त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत. अनेक वर्षांपासून मागण्या करूनही शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याची खंत खेळाडूंनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात खेळाडूंना केवळ आश्वासने मिळतात, सुविधा मिळत नाहीत. ११ हजार रुपयांत ऑलिंपिक पदकांचे स्वप्न पाहणारे सरकार खेळाडूंची थट्टा करत आहे. आम्ही लेखी आदेश मिळाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही.
- सुरेखा भानुदास शिरसाठ, आंतरराष्ट्रीय ज्युडोपटू

मुलाच्या मृत्यूप्रकरणी पालकांचे आमरण उपोषण
अंबरनाथ येथील अर्चना आणि आशीष पाटील हे दाम्पत्य ११ मेपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहे. त्यांचा मुलगा शिवांश पाटील याचा एप्रिलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाडिया रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि प्रशासनाच्या हलगर्जीमुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अनेक निवेदने आणि पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

आमचा मुलगा गेला, पण दोषींवर कारवाई होत नाही. आम्ही भीक मागत नाही, न्याय मागत आहोत. सरकार आणि प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अन्यथा आमचा लढा आणखी तीव्र करू.
- आशीष पाटील, पालक

शिपिंग क्षेत्रातील कथित फसवणुकीविरोधात जनआक्रोश
राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटनेच्या वतीने शिपिंग क्षेत्रात नोकरीचे प्रलोभन दाखवून झालेल्या कथित फसवणुकीविरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या म्हणण्यानुसार, ९० हून अधिक युवकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असून, अनेकांचे सीडीसी, पासपोर्टसह महत्त्वाची कागदपत्रे संबंधितांकडे अडकून पडली आहेत. आरोपींवर गुन्हे दाखल करून अटक करावी आणि युवकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. अनेक युवकांचे परदेशात नोकरीचे स्वप्न उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे.

शेकडो युवकांचे करिअर उद्ध्वस्त झाले, कुटुंबे कर्जबाजारी झाली; पण आरोपी अजून मोकाट फिरत आहेत. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारू.
- प्रिया दिशेने सरोदे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्री-वेडीग शूट, इंडोनेशिया ट्रीप, पासपोर्टची चोरी अन् लोहगड ट्रेक; सियाने केतनच्या हत्येसाठी रचला होता भयंकर कट

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

Mumbai News: दूषित पाण्यामुळे मृत्यू; पिण्याचे स्वच्छ पाणी कधी मिळणार? हायकोर्टचा राज्य सरकारला थेट सवाल, अहवाल मागवला

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा

Male Fertility Warning: पुरुषांनो सावधान! ताण, अपुरी झोप आणि 'या' सवयींमुळे होऊ शकतो तुमच्या fertility वर परिणाम

SCROLL FOR NEXT