धारावीतील अनेक भाग जलमय
नाल्याची संरक्षक भिंत कोसळली, पालिकेच्या दाव्यांची पोलखोल
धारावी, ता. २४ (बातमीदार) : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धारावीतील अनेक भागांत पाणी साचून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शास्त्रीनगर, मुकुंदनगर, गोपीनाथ कॉलनी, ढोरवाडा आदी परिसर जलमय झाले असून, अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली आहे.
दरम्यान, संत कक्कया मार्ग परिसरात ‘बेस्ट’च्या वीजवाहिनीत बिघाड झाल्याने दगडी बिल्डिंगसह आसपासच्या भागातील वीजपुरवठा रात्रभर खंडित होता. माटुंगा लेबर कॅम्प परिसरातही रात्रीपासून वीज नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली. ‘बेस्ट’च्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.
धारावी मुख्य रस्त्यावरील शेटवाडी येथील मुख्य नाल्याची पुरेशी सफाई न झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या नाल्यावरील संरक्षक भिंत अचानक कोसळली. सुदैवाने भिंत नाल्यात कोसळल्याने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र, त्यामुळे नाल्याच्या पाण्याचा प्रवाह बाधित झाला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रभाग क्रमांक १८६ चे शाखाप्रमुख किरण काळे यांनी सांगितले की, धारावीतील अनेक नाल्यांची वेळेत सफाई न झाल्याने पावसाचे पाणी साचण्याची भीती त्यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार व्यक्त केली होती. याबाबत अनेक निवेदनेही देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने पहिल्याच जोरदार पावसात अनेक भागांत पाणी तुंबल्याचा आरोप त्यांनी केला.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. मात्र, धारावीतील परिस्थितीमुळे या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालिकेच्या तयारीची पोलखोल झाल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.