कासा, ता. २४ (बातमीदार) : यंदा माॅन्सूनच्या आगमनास विलंब झाल्याने शेतकरी, व्यापारी आणि नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहात होते. साधारणपणे ७ जूनच्या सुमारास सुरू होणारा पाऊस यावर्षी २३ जूनला दाखल झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कासा बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होत असून, पावसाळी साहित्याच्या विक्रीला वेग आला आहे.
पावसाअभावी गेल्या काही दिवसांपासून छत्र्या, रेनकोट, पावसाळी चपला, प्लॅस्टिक आदी साहित्याची विक्री मंदावली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, पावसाने हजेरी लावताच ग्राहकांची वर्दळ वाढली असून, बाजारपेठेत पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे.
कासा बाजारपेठेतील पावसाळी साहित्याच्या दुकानांमध्ये सध्या ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही पाऊस नसल्याने अनेक पालकांनी विद्यार्थ्यांसाठी छत्र्या व रेनकोट खरेदी केले नव्हते. आता पावसाचा जोर वाढताच विद्यार्थ्यांसह नोकरदार आणि शेतकरीवर्गाकडूनही पावसाळी साहित्याची खरेदी वाढली आहे.
कृषी व्यवसायालाही चालना
दरम्यान, शेती हंगामाला सुरुवात होत असल्याने बियाणे, खते आणि कृषी साहित्याच्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी वाढली आहे. शेतकरी पेरणीपूर्व तयारीला लागल्याने कृषी व्यवसायालाही चालना मिळाली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा छत्र्यांच्या किमतीत सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेक दिवस पाऊस नसल्याने यंदा व्यवसाय होईल की नाही, अशी चिंता वाटत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे ग्राहकांची संख्या वाढली आहे.
- अजय वर्मा, छत्री विक्रेते, कासा
पावसाला सुरुवात झाल्याने छत्री विकत घ्यावी लागत आहे. सध्या पूर्वीपेक्षा किमतीदेखील वाढलेल्या आहेत; पण पावसाळ्यापूर्वी पावसाळी चप्पल, छत्री लागतात. सध्या उशिरा पाऊस सुरू झाल्याने शेतात भात पेरणीदेखील करावी लागणार आहे.
- रवींद्र मातेरा, ग्राहक, वाघाडी
कासा : पावसाच्या आगमनानंतर बाजारपेठेत छत्री खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.