मुंबई

आठवडा बाजारांना अधिकाऱ्यांचे अभय

CD

आठवडा बाजारांना अधिकाऱ्यांचे अभय
नगरसेवक विकास घरत यांचा प्रशासनावर आरोप, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा
पनवेल, ता.२४ (बातमीदार) : कामोठे शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण, अनधिकृत हातगाड्या आणि आठवडी बाजारांमुळे नागरिकांचे जीवन त्रस्त झाले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या प्रकारांना अभय मिळत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक विकास घरत यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेच्या आगामी महासभेत प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कामोठे शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्याचबरोबर अनधिकृत हातगाड्या आणि फेरीवाल्यांमुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः शाळा, रुग्णालये, बाजारपेठ परिसर आणि प्रमुख रस्त्यांवर नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, अपघातांचा धोकाही वाढला आहे.
महासभेसाठी सादर केलेल्या प्रश्नामध्ये घरत यांनी कामोठे परिसरात अनधिकृतपणे भरविण्यात येणाऱ्या आठवडा बाजारांविरोधात तत्काळ आणि कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी केली आहे. या बाजारांमुळे चोरी, साखळी चोरी, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आणि वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यापूर्वी अनेक वेळा पत्रव्यवहार करून तसेच सभागृहात विषय उपस्थित करूनही प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याबद्दल घरत यांनी नाराजी व्यक्त केली. वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही होत नसेल, तर यासाठी जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच संबंधित अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष का करीत आहेत, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार का, अशी विचारणाही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

चौकट
प्लॅस्टिक बंदीचा आदेश धाब्यावर
प्लॅस्टिक बंदी असतानाही आठवडा बाजारामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. मुंबईतील विक्रेते प्लॅस्टिक पनवेल परिसरात म्हणजे सिडको वसाहतीमध्ये बाजारामार्फत आणून टाकत आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. याशिवाय प्लॅस्टिक बंदीचा आदेश धाब्यावर बसवण्यात आला आहे आणि ही घाण काढण्यासाठी पनवेल पालिकेचे मनुष्यबळ वापरले जाते असा आरोप विकास घरात यांनी केला आहे.

कोट :
कामोठे शहरातील अनधिकृत अतिक्रमण व आठवडा बाजारांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
- विकास घरत, नगरसेवक

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

‘गव्हर्नर माझ्यासाठी...’ मनोज बाजपेयींसोबतच्या अनुभवावर चिन्मय मांडलेकरची खास पोस्ट; फोटो व्हायरल!

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

SCROLL FOR NEXT