मुसळधार पावसाचा ट्रान्स हार्बरला फटका
तुर्भे-कोपरखैरणे यादरम्यान रुळाखालची माती खचली; दोन तास रेल्वे वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : मुसळधार पावसामुळे तुर्भे आणि कोपरखैरणे रेल्वे स्थानकांदरम्यान रुळाखालची माती खचल्याने बुधवारी पहाटे ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी विभागातील रेल्वे वाहतूक विस्कळित झाली. अतिरिक्त पाण्याच्या प्रवाहामुळे रुळाखालचा भराव वाहून गेल्याने रेल्वे प्रशासनाने तत्काळ दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा थांबवून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मार्ग सुरक्षित करण्यात आला आणि लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. मात्र, सकाळच्या गर्दीच्या वेळेत घडलेल्या या घटनेमुळे हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, तुर्भे-कोपरखैरणे स्थानकांदरम्यान अतिरिक्त पाण्याच्या प्रवाहामुळे रेल्वे रुळाखालच्या भरावाचा काही भाग वाहून गेला. परिस्थिती धोकादायक असल्याने सकाळी ५.०६ वाजता ठाण्याकडे जाणारा अप मार्ग असुरक्षित घोषित करण्यात आला. त्यानंतर परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन ५.५० वाजता पनवेल-वाशी दिशेचा डाऊन मार्गही बंद करण्यात आला. परिणामी ठाणे-वाशी आणि ठाणे-पनवेल मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. खचलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर खडी, दगड आणि मुरूम टाकून भराव मजबूत करण्यात आला. तसेच रुळांच्या स्थैर्याची आणि सुरक्षिततेची सखोल तपासणी करण्यात आली.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी ७.२७ वाजता अप मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित घोषित करण्यात आला. सुरुवातीला या मार्गावर ताशी १० किलोमीटर वेगमर्यादा लागू करण्यात आली. त्यानंतर ७.३५ वाजता डाऊन मार्गही सुरू करण्यात आला आणि त्या मार्गावर ताशी ३० किलोमीटर वेगाने गाड्या चालविण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यान, रेल्वे सेवा बंद राहिल्याने ठाणे, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे आणि वाशी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. अनेक नोकरदारांना बस, टॅक्सी आणि खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागला, तर अनेक जण कार्यालयात उशिरा पोहोचले.
यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे मार्गालगतच्या भरावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाणे आणि नवी मुंबईला जोडणारा ट्रान्स हार्बर मार्ग हा लाखो प्रवाशांसाठी जीवनवाहिनी मानला जात असल्याने अशा संवेदनशील ठिकाणी अधिक भक्कम संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
-------------------
डोंबिवली येथून नेरूळला कामासाठी निघाले. पावसामुळे मध्य रेल्वेदेखील उशिराने धावत होती. मात्र, ठाणे ते नेरूळ सेवा अर्ध्या तासाहून अधिक उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थानकावर अधिक वेळ ताटकळत राहावे लागले. कामावर जायला तासभर उशीर झाला.
- वैशाली चव्हाण, प्रवासी ठाणे-नेरूळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.