नवी मुंबईत ‘मुलगी हवी’ मानसिकतेला बळ
वर्षभरात ४,८१० मुलींचा जन्म
बेलापूर, ता. २४ (बातमीदार) : ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ हे ब्रीदवाक्य आज प्रत्यक्षात उतरतानाचे चित्र समाजात दिसून येत आहे. विविध क्षेत्रांत मुली उल्लेखनीय कामगिरी करत असल्याने ‘मुलगी नको’ या जुन्या मानसिकतेची जागा आता ‘मुलगी हवी’ या सकारात्मक विचारांनी घेतली आहे. याच बदलत्या सामाजिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब नवी मुंबईतही पाहायला मिळत आहे.
नवी मुंबई महापालिका अखत्यारीतील ऐरोली, नेरूळ, वाशी आणि बेलापूर येथील पालिका रुग्णालयांमध्ये गेल्या वर्षभरात तब्बल ४,८१० मुलींचा सुखरूप जन्म झाला आहे. मुलींच्या जन्माबाबत समाजातील सकारात्मकता वाढल्याने ही संख्या आशादायक मानली जात आहे.
स्त्री सक्षमीकरण, शिक्षणाचा वाढता प्रसार, सामाजिक संस्थांचे प्रयत्न आणि विविध जनजागृती मोहिमांमुळे मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याची संस्कृती अधिक दृढ होत आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर कुटुंबांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्याची परंपराही वाढताना दिसत आहे.
चौकट
समुपदेशनाचा सकारात्मक परिणाम
पालिका रुग्णालयांमध्ये मुलींचे महत्त्व अधोरेखित करणारी भित्तीचित्रे, माहितीफलक आणि समुपदेशन कार्यक्रम सातत्याने राबविले जात आहेत. गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात असून, आवश्यक तेथे दंडात्मक कारवाईही केली जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समुपदेशन, जनजागृती आणि कडक अंमलबजावणीमुळे मुलींच्या जन्माबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक बळकट होत असल्याचे पालिका रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
बॉक्स
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ कन्यारत्न आकडेवारी :
रुग्णालय नाव मुलींचा जन्म
जनरल रुग्णालय, ऐरोली १,५४१
जनरल रुग्णालय, नेरूळ १,८९१
जनरल रुग्णालय, वाशी १,२५८
माताबाल रुग्णालय, बेलापूर १२०
------------------------------------------------------------
एकूण ४,८१०
कोट
मुलगी झाली ही बाब आमच्यासाठीदेखील तितकीच आनंदाची असते जितकी पालकांसाठी. आज सर्वोच्च स्थानावर सर्वच क्षेत्रात मुली असून, मुलगी जन्माला येणे आणि तिचे आनंदाने, अभिमानाने स्वागत करणे हे पाहणे आमच्यासाठी सुखद आहे.
- डॉ. राजेश म्हात्रे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.