२४ तासांत नवी मुंबईला पावसाचा तडाखा
१६ ठिकाणी झाडे कोसळली
१२५ मिमीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी; १६ ठिकाणी झाडे कोसळली, मोरबे धरणातील जलसाठ्यात वाढ
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : मॉन्सूनने अखेर नवी मुंबईत दमदार हजेरी लावत अवघ्या २४ तासांत शहराला अक्षरशः झोडपून काढले. मंगळवारी (ता. २३) सकाळी साडेआठ ते बुधवारी (ता. २४) सकाळी साडेआठ या कालावधीत शहरात सरासरी १२५.२३ मिमी पावसाची नोंद झाली.
मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत झाडे कोसळणे, फांद्या तुटणे, शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या, तर अनेक भागांतील वाहतुकीवरही परिणाम झाला. दुसरीकडे नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाचा फटका दैनंदिन जनजीवनालाही बसला. सकाळच्या वेळेत ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली, तर काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी समोर आल्या. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिवसभर सतर्क राहून विविध घटनांवर तत्काळ प्रतिसाद दिला.
विभाग पावसाची नोंद (मिमी मध्ये)
बेलापूर १३९.४० मिमी
नेरूळ १३६.९५ मिमी
ऐरोली १२२.५५ मिमी
वाशी १२२.५० मिमी
कोपरखैरणे ११५.६० मिमी
दिघा ११४.४० मिमी
१६ ठिकाणी झाडे कोसळली, तीन शॉर्टसर्किटच्या घटना
१. गेल्या २४ तासांत शहरात झाडे पडण्याच्या १६, फांद्या तुटण्याच्या दोन आणि विद्युत यंत्रणेशी संबंधित तीन घटना घडल्या. एकूण २१ घटनांची नोंद महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली. कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडली नाही. झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाशी परिसरात सर्वाधिक सात, बेलापूरमध्ये चार, नेरूळमध्ये तीन आणि ऐरोलीमध्ये दोन झाडे पडली.
२. बेलापूर येथील सिडको भवन परिसरात आणि ऐरोली सेक्टर २ मध्ये झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या.
३ याशिवाय ऐरोली सेक्टर २०, कोपरखैरणे सेक्टर १९ आणि नेरूळ सेक्टर १९ येथे शॉर्टसर्किटच्या तीन घटना नोंदविण्यात आल्या. सर्व घटनांमध्ये अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
दोन वाहनांचे नुकसान
मंगळवारी रात्री बेलापूर सेक्टर २० येथे एक मोठे झाड किया कार आणि महिंद्रा पिकअप वाहनावर कोसळल्याची घटना घडली. अग्निशमन विभागाने तत्काळ झाड हटवून परिसर मोकळा केला. या घटनेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.