सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : ठाकुर्ली येथील स. वा. जोशी स्कूलजवळील डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पुलाच्या रखडलेल्या कामावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या काळात याच पुलाच्या कामाच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली होती; मात्र निवडणूक संपल्यानंतरही पुलाचा ९० फूट रस्त्याकडे उतरणारा आर्म अपूर्णच राहिल्याने आता भाजपच्या नगरसेवकांनीच महासभेत या कामाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे निवडणुकीत श्रेयासाठी गाजलेला हा पूल प्रत्यक्षात पूर्ण कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
ठाकुर्ली येथील जोशी स्कूलजवळील हा पूल डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा महत्त्वाचा वाहतूक दुवा आहे. रेल्वे मार्गामुळे पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी नागरिकांना मोठा वळसा घ्यावा लागत आहे. ठाकुर्ली पुलावर जाण्यासाठी चोळेगावातून जावे लागत असल्याने या मार्गांवर सकाळ, दुपार, संध्याकाळ वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत या पुलामुळे वाहतुकीला मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे; मात्र पुलाचा ९० फूट रस्त्याकडे म्हसोबा चौकात जाणारा आर्म पूर्ण झालेला नसल्याने पुलाचा अपेक्षित फायदा नागरिकांना अद्याप पूर्णपणे मिळत नाही. परिणामी, परिसरातील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या पुलाच्या कामावरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय श्रेयवाद चांगलाच रंगला होता. पुलाचे काम आपल्या पाठपुराव्यामुळे झाले, असे दावे दोन्ही बाजूंनी करण्यात आले होते. त्यामुळे हा पूल निवडणुकीतील राजकीय प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. निवडणुकीमुळे का होईना वर्षानुवर्षे रखडलेल्या या पुलाचे काम मार्गी लागेल, अशी आशा नागरिकांच्या मनात निर्माण झाली होती; मात्र निवडणुकीची धामधूम संपली आणि हा प्रश्नदेखील पाठी पडला.
प्रशासनाची भूमिका महत्त्वाची
महासभेतील चर्चेनंतर महापौर आणि महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन जमीन अधिग्रहणासह पुलाच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता प्रशासनाकडून या कामाला प्रत्यक्षात किती गती दिली जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
...तर वाहतूक काेंडी कमी हाेईल
दरम्यान, ९० फूट रस्त्याकडे जाणारा आर्म पूर्ण झाल्यास डोंबिवली पूर्व-पश्चिम वाहतूक अधिक सुरळीत होण्याची शक्यता आहे. परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच नागरिकांचा प्रवासाचा वेळही वाचणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामाला आता राजकीय श्रेयवादाच्या पलीकडे जाऊन प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.