पेणमध्ये कारागिरांची लगबग वाढली
गणेशमूर्तींचे रंगकाम, डोळे आखणी आणि दागदागिन्यांच्या सजावटीला वेग
पेण, ता. २८ (वार्ताहर) : गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून जगभरात ओळख असलेल्या पेणमध्ये गणेशोत्सव नजीक आल्याने मूर्तिकार आणि कारागिरांची लगबग वाढली आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने लाखो गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मूर्तींचे रंगकाम, डोळे आखणी, डोक्यावर फेटे बसविणे तसेच दागदागिने आणि विविध अलंकारांची सजावट करण्यासाठी कारागीर दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.
पेण तालुक्यातील अंतोरे, दादर, जोहे, कळवे, तांबडशेत, हमरापूर, वडखळ, बोरी, शिर्की, उंबर्डे आणि कोप्रोली यांसह पेण शहरातील कासार आळी, गुरव आळी, फणसडोंगरी, नवीन वसाहत, कुंभार आळी, गांगल आळी, नंदीमाळ नाका आणि उत्कर्षनगर परिसरातील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये सध्या मोठी लगबग पाहायला मिळत आहे. प्राथमिक स्वरूपातील मूर्तीनिर्मितीचे काम पूर्ण झाल्यानंतर आता मूर्तींना आकर्षक रूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मूर्तीला योग्य रंगसंगती देण्याबरोबरच चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांची आखणी आणि मुकुट, फेटे व दागदागिन्यांची सजावट याकडे कारागीर विशेष लक्ष देत आहेत. मूर्तीचा चेहरा आणि डोळ्यांची आखणी हा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जात असल्याने अनुभवी कारागिरांकडून हे काम काळजीपूर्वक केले जात आहे. आकर्षक आणि उठावदार मूर्तींना ग्राहकांची पसंती मिळत असल्याने कारखानदारही विविध प्रकारच्या सजावटीचे प्रयोग करीत आहेत. पेणच्या गणेशमूर्तींना महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून मोठी मागणी असते. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई यांसह अनेक शहरांमध्ये पेणमधून गणेशमूर्ती पाठविल्या जातात. भारताबरोबरच परदेशातही येथील गणेशमूर्तींचे आकर्षण असल्याने गणेशोत्सवाच्या काळात पेणमधील मूर्ती कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम सुरू असते. त्यामुळे मूर्ती वेळेत पूर्ण करून त्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान सध्या कारखानदारांसमोर आहे.
----
सजावट साहित्याचा बाजारही बहरला
मूर्ती खरेदीसाठी दुरदूरचे व्यापारी, भाविक पेणमध्ये येत असतात. गणपतीमूर्तीबरोबर सजवट साहित्य खरेदी कारण्याचा त्यांचा जास्त प्रयत्न असतो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेण शहरातील बाजारपेठाही सजल्या आहेत. गणेशमूर्ती सजावटीचे साहित्य, पूजा साहित्य, विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारच्या साहित्याने दुकाने फुलली आहेत. खरेदीसाठी नागरिकांची गर्दीही हळूहळू वाढू लागली आहे.
----------
पेणच्या गणेशमूर्तींना भारतासह परदेशातही मोठी मागणी आहे. आकर्षक रंगसंगती, बारकाईने केलेली डोळ्यांची आखणी आणि दागदागिन्यांची सुबक सजावट ही येथील मूर्तींची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यामुळे बाप्पाच्या आगमनापूर्वी प्रत्येक मूर्ती अधिक देखणी करण्यासाठी कारागीर कसोशीने काम करीत आहेत, असे दीपक कला केंद्राचे कारखानदार दीपक समेळ यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.