सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी मिळाल्याने प्रवाशांनी आतापासूनच वाढीव भाडे देऊ नये. नवे दर १ सप्टेंबरपासून लागू होणार असून, मीटरमध्ये अधिकृत बदल केल्यानंतरच सुधारित भाडे आकारता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रिक्षाचालक सांगेल, त्यानुसार नव्हे तर मीटरनुसारच भाडे द्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात पुन्हा एक रुपयाने वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. २०१७ पासून भाडेवाढ प्रलंबित होती. यापूर्वी दीड वर्षापूर्वी तीन रुपयांची भाडेवाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एक रुपयाची वाढ मंजूर झाली असून, १ सप्टेंबरपासून सुधारित दर लागू होणार आहेत.
सध्याच्या रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये सुरुवातीचे भाडे २६ रुपये आहे. भाडेवाढीनंतर ते २७ रुपये होणार आहे. मात्र, केवळ प्राधिकरणाने भाडेवाढ मंजूर केली म्हणून चालकांना लगेच वाढीव भाडे आकारता येणार नाही. त्यासाठी मीटरमध्ये नव्या दराची नोंद करून त्याचे फेरकॅलिब्रेशन करणे आवश्यक आहे.
८० हजार मीटर बदलण्याचे आव्हान
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे ८० हजारांहून अधिक रिक्षांची नोंदणी आहे. या सर्व रिक्षांच्या मीटरमध्ये सुधारित दराची नोंद करून घेण्याची प्रक्रिया मोठी आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांना १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मीटरचे फेरकॅलिब्रेशन करून घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी चालकांना स्वतःच्या खर्चाने अधिकृत मीटरधारकाकडून हा बदल करून घ्यावा लागणार आहे. या प्रक्रियेबाबत ठाण्यातील मीटर फेरकॅलिब्रेशन करणाऱ्या अधिकृत संस्थांसोबत प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २७) बैठक झाली. मीटरमध्ये बदल केल्यानंतर चालकाला त्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
भाडेवाढीपूर्वीच जादा वसुली
भाडेवाढीला मंजुरी मिळाल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर काही रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून आतापासूनच वाढीव भाडे आकारण्यास सुरुवात केल्याच्या तक्रारी आरटीओकडे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे १ सप्टेंबरपूर्वी प्रवाशांनी कोणत्याही परिस्थितीत सुधारित दराने भाडे देऊ नये, असे आरटीओने स्पष्ट केले आहे. सुधारित भाडे लागू झाल्यानंतरही प्रवाशांनी मीटरवरील भाडे आणि अधिकृत भाडेदरपत्रक तपासूनच पैसे द्यावेत. मीटरमध्ये अधिकृत फेरकॅलिब्रेशन न करता जादा भाडे आकारणाऱ्या चालकांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार करता येणार आहे.
सुधारित भाडेदर लागू होण्यापूर्वी प्रत्येक रिक्षा-टॅक्सीचे मीटर नियमानुसार फेरकॅलिब्रेशन होणे आवश्यक आहे. प्रवाशांनी मीटर आणि अधिकृत भाडेदरपत्रक तपासूनच भाडे द्यावे. जादा भाडे आकारणाऱ्या चालकांविरोधात नागरिकांनी तक्रार करावी.
- हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.