मुंबई

‘मराठी शिका, व्यवसाय वाढवा’

CD

‘मराठी शिका, व्यवसाय वाढवा’
अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांचा सूर; ग्राहकांशी संवाद साधणे झाले सोपे

नितीन जगताप ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता २८ : देशात कोणत्याही भागात व्यवसाय करायचा असेल तर त्या भागातील भाषा येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात राहताना मराठी आलीच पाहिजे. स्थानिक भाषा आत्मसात केली तर आपुलकी वाढते व व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो, असे मत मुंबईतील बहुतांश अमराठी रिक्षाचालकांनी व्यक्त केले.
राज्यातील रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने गेल्या १०५ दिवसांपासून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ राबविण्यात आले. या अभियानाला सुमारे एक लाख ६५ हजार ६०० अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांनी प्रतिसाद देत मराठीचे प्रशिक्षण घेतले. बोरिवली येथील कोरा केंद्र ग्राउंडवर २० हजार हिंदी भाषिक रिक्षा व टॅक्सीचालकांना मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षणाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या निवडक रिक्षाचालकांशी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने संवाद साधला.

भाषा शिका, व्यवसाय वाढवा
मुंबईत राहतो तर मराठी चांगल्या रीतीने आली पाहिजे. त्यामुळे ग्राहकांशी अधिक चांगला संवाद साधू शकतो. बऱ्याचदा काही काही ग्राहक ग्रामीण भागातून येतात, त्यांना हिंदी समजत नाही; मात्र आता मराठी शिकल्यामुळे सर्वांशी संवाद साधणे सोपे जाते. गेल्या काही दिवसात प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याच्या प्रतिक्रिया बहुतांश मराठी शिकलेल्या अमराठी रिक्षाचालकांच्या होत्या. काही रिक्षाचालक मराठी शिकण्याला विरोध करतात, तो विरोध चुकीचा आहे, उलट मराठी न शिकल्यास नुकसान रिक्षाचालकांचे होईल, असेही काही रिक्षाचालकांनी सांगितले.

मराठीत संवाद, मिळाली टीप
एका प्रवाशाला नॅशनल पार्कवरून विरारला जायचे होते. त्याने मला विचारले, विरारला येणार का? मी होकार दिला. प्रवाशाच्या घरी सुखरूप सोडून दिले. केवळ मराठीत संवाद साधल्यामुळे या प्रवाशाला माझ्याबद्दल आपुलकीची भावना वाटली व त्याने मला शंभर रुपयाची टीप दिल्याचे एका रिक्षाचालकाने सांगितले.

प्रवासी हिंदीत संवाद सुरू करतात
मुंबईत राहतो तर मराठी यायलाच हवी; पण शंभरापैकी पाचच प्रवासी मराठीत संवाद साधतात. अनेकदा मराठी रिक्षाचालक असेल तरीही प्रवासी हिंदीत संवाद सुरू करतात. त्यामुळे नाईलाजाने रिक्षाचालकांनाही हिंदीत बोलावे लागते; परंतु कोणी मराठीत बोलले तर आम्ही जरूर मराठीत बोलतो. बहुतांश रिक्षाचालकांचे हे मत होते.

अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न
मराठी प्रशिक्षण वर्गात १५ ते १६ वाक्य शिकवण्यात येत आहेत. त्याच वाक्यांवर आधारित प्रश्न आरटीओ अधिकाऱ्यांनी विचारणे अपेक्षित आहे; परंतु अनेकदा या वाक्यांव्यतिरिक्त म्हणजेच अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न अधिकाऱ्यांकडून विचारले जातात. त्यांचे उत्तर देण्यास रिक्षाचालक अपयशी ठरतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होते, अशी तक्रारही काही चालकांनी केली.

लेफ्ट म्हणजे उजवीकडे
मराठी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आली असली तरीही अनेक रिक्षाचालकांनी कोर्स पूर्ण करूनही त्यांचे काही शब्दात गोंधळ होत आहे. एका रिक्षाचालकाला याबाबत विचारले असता लेफ्ट म्हणजे उजवीकडे तर राईट म्हणजे डावीकडे, असे उत्तर दिले.

चार दिवस मराठी भाषा प्रशिक्षण वर्गासाठी गेलो होतो. त्याचा मला चांगला फायदा झाला. यामध्ये प्राथमिक प्रवासासाठी आवश्यक असणारे शब्द उजवीकडे वळा, डावीकडे वळा, बुकिंग आहे, हे शिकवले.
- पप्पू साहू, रिक्षाचालक

बऱ्याचदा भाडे नाकारल्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवाशांचे वाद होतात. रिक्षाचालकाला घरी जायचे असेल तरीही काही प्रवासी ऐकायला तयार नसतात; मात्र मराठीमध्ये आम्ही ‘भाऊ मला घरी जायचं आहे, मला माफ करा,’ असे म्हटले की प्रवाशांची नाराजी कमी होते.
- टाकेश्वर साहू, रिक्षाचालक

मराठीच्या अभ्यासक्रमात एकूण १५ वाक्य आहेत; मात्र दोन-तीन दिवस क्लास केल्यामुळे मला केवळ तीन वाक्य येतात. उर्वरित मराठी माझ्या मराठी मित्रांकडून शिकतोय.
- अजय कुमार एस.

पाच दिवसांत कोणती भाषा शिकणे शक्य नाही. त्यासाठी आणखी सराव करायला हवा, मी यूट्युबवर सराव करीत आहे.
- यशवंतकुमार प्रसाद, रिक्षाचालक

गेल्या तीन दशकांपासून मी मुंबईत राहतो. सुरुवातीला माझे शेजारी मराठी होते, त्यामुळे मला मराठी येत होती. नंतर मी यूपी-बिहारच्या मित्रांसोबत राहायला आलो, त्यानंतर मराठीमध्ये खंड पडला. आता पुन्हा सराव करीत आहे.
- सदाब्रिज केवट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati News : अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवारांसह बारामतीतील भगिनीही भावुक....

Viral Video: स्टंपची अदलाबदल केली राव, तरी विकेट काही मिळेना! ध्रुव जुरेलचा भन्नाट जुगाड; VIDEO तुफान व्हायरल

शाळेत पाठवण्याऐवजी बारमध्ये नेलं, ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करायला सांगितलं अन्...; अल्पवयीन मुलीसोबत आत्याचं अमानुष कृत्य

१९ दिवसांपूर्वी लग्न, पती रक्षाबंधनला पत्नीला माहेरी सोडायला निघाला; मिठाई आणायला गेला अन्... नववधू प्रियकरासोबत फरार

Marathi News Live Updates : नागपुरात कंत्राटदारांचा संताप

SCROLL FOR NEXT