पदपथांवर पुन्हा ‘वाहनराज’
चेंबूर ते भांडुपपर्यंत रिक्षा, दुचाकींमुळे पादचाऱ्यांची गैरसोय
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई उपनगरांतील पदपथांवरील अनधिकृत बांधकामांवर पालिकेकडून तोडक कारवाई करून पदपथ मोकळे केले जात असताना, दुसरीकडे रिक्षा, दुचाकी तसेच खाद्यपदार्थ विक्रीच्या वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमुळे पुन्हा पादचाऱ्यांची कोंडी होत आहे. अतिक्रमणमुक्त झालेल्या फुटपाथमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी वाहनांच्या पार्किंगमुळे फुटपाथचा मार्ग पुन्हा अडवला जात असल्याचे चित्र मुंबई उपनगरांतील विविध भागांत दिसून येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई पालिकेकडून मुंबईसह उपनगरांतील पदपथांवरील अतिक्रमणांवर कठोर कारवाई सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी फुटपाथ अतिक्रमणमुक्त झाले असून, मुंबईकरांना पदपथावरून चालणे काही प्रमाणात सुलभ झाले आहे. मात्र चेंबूर, गोवंडी, देवनार, मानखुर्द, कुर्ला, टिळकनगर, विक्रोळी, भांडुप यांसह विविध भागांत रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार सर्रासपणे फुटपाथवर किंवा फुटपाथच्या अगदी कडेला वाहने उभी करीत आहेत. त्यातच खाद्यपदार्थ विक्रीची वाहने आणि स्टॉल्सही फुटपाथ व फुटपाथलगत उभारले जात असल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे.
मुंबईसह उपनगरांत पुनर्विकासाला वेग आला असून, गगनचुंबी इमारतींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत उपलब्ध पार्किंगची जागा अपुरी पडत आहे. नवीन इमारतींमध्ये वाहनतळाच्या नियमांचे योग्य पालन न होणे तसेच झोपडपट्टी परिसरात वाहनांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसणे, यामुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
फुटपाथवर वाहने उभी राहिल्याने पादचाऱ्यांना अनेकदा पदपथ सोडून थेट रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अतिक्रमण हटवून पदपथ मोकळे करणे ही केवळ पहिली पायरी आहे. पदपथांवर पुन्हा वाहने किंवा स्टॉल्स उभे राहणार नाहीत, यासाठी महापालिका, वाहतूक पोलिस आणि पोलिस विभागाने संयुक्तपणे नियमित कारवाई करणे गरजेचे आहे. फुटपाथ हे पादचाऱ्यांसाठी आहेत, वाहनतळासाठी नव्हेत. त्यामुळे फुटपाथवर वाहने उभी करणाऱ्यांवर आणि मार्ग अडवणाऱ्या स्टॉल्सवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पालिकेने कारवाई करून पदपथ मोकळे केले. त्यामुळे आम्हाला चालणे सोयीचे झाले होते. मात्र आता रिक्षा आणि दुचाकी पुन्हा पदपथावर उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. वाहतूक पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन फुटपाथ तातडीने मोकळे करावेत.
- संदीप चव्हाण, स्थानिक नागरिक
दिवसभर रिक्षा चालवून रात्री फुटपाथवर त्या उभ्या करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे. फुटपाथ हा पादचाऱ्यांसाठी आहे, पार्किंगसाठी नाही. रिक्षा आणि दुचाकींमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते आणि अपघाताचा धोका वाढतो. संबंधित यंत्रणांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता अनधिकृत पार्किंगवर कडक कारवाई करावी.
- नरेश सावंत, क्रीडापटू
अतिक्रमणाबरोबरच अनधिकृत पार्किंग, टपऱ्या तसेच वाहतूक व रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर कारवाई होणे गरजेचे आहे. नागरिकांना मोकळा रस्ता आणि फुटपाथ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारच्या अतिक्रमणांविरोधात कठोर कारवाई करावी.
- अनिल गलगली, आरटीआय कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.