मुरबाड, ता. २८ (वार्ताहर) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधून त्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाण्याच्या उद्देशाने शिक्षण विभाग पंचायत समिती, मुरबाड यांच्या वतीने इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वेध गुणवत्तेचा-अनुशीलन’ हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली यांच्या महत्त्वपूर्ण आर्थिक साह्यातून सुरू झालेल्या या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन १ ऑगस्टला म्हसा येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी रंजित यादव, ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, मुरबाड गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने मुरबाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड यांच्या सखोल मार्गदर्शन व नियंत्रणाखाली तसेच रोटरी क्लब डोंबिवली यांच्या आर्थिक साह्याने महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. तालुक्यातील एकूण २९ केंद्रांमधील तब्बल ३२९ शाळा या उपक्रमात हिरिरीने सहभागी झाल्या आहेत. यामध्ये इयत्ता चौथीचे २०२२ तर इयत्ता सातवीचे १,२५३ असे एकूण ३,२७५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करीत आहेत.
पूर्व चाचणी परीक्षा
विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी आणि तयारीचा अंदाज घेण्यासाठी ४ ऑगस्टला शिष्यवृत्ती पूर्व चाचणी परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली.
‘यशोदीप’ मार्गदर्शिकांचे वाटप
रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या वतीने उपक्रमात सहभागी प्रत्येक शाळेला इयत्तानिहाय ‘शिष्यवृत्ती यशोदीप मार्गदर्शिका’ या पुस्तकांचा एक संच उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची कोणतीही कमतरता नाही, त्यांना गरज आहे ती फक्त योग्य दिशा आणि सुयोग्य मार्गदर्शनाची. ‘वेध गुणवत्तेचा-अनुशीलन’ या उपक्रमाच्या माध्यमातून आपण मुरबाडच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील स्पर्धा परीक्षांचा भक्कम पाया रचत आहोत.
- मधुकर घोरड, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, मुरबाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.