सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : मुंब्रा रेतीबंदर परिसरातील नागरिकांसाठी लवकरच खाडी किनारी विरंगुळ्याचे एक नवे ठिकाण उपलब्ध होणार आहे. रेतीबंदर चौपाटीच्या सुशोभीकरणाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही चौपाटी केवळ सुशोभीकरणापुरती मर्यादित न ठेवता नागरिकांसाठी बहुउद्देशीय विरंगुळा आणि क्रीडा केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिल्या. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उर्वरित सुविधांची कामेही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी राव यांना दिल्या.
मुंब्रा रेतीबंदर परिसरातील नागरिकांना फेरफटका मारता यावा, कुटुंबीयांसोबत निवांत वेळ घालवता यावा आणि दैनंदिन धावपळीतून काही क्षण विरंगुळा मिळावा, या उद्देशाने चौपाटीचा विकास करण्यात येत आहे. खासदार शिंदे यांनी या प्रकल्पाची गुरुवारी (ता. २७) पाहणी करून कामाचा आढावा घेतला. लहान मुलांसाठी खेळण्याची साधने आणि स्वतंत्र खेळण्याची जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा आणि मनोरंजनाच्या सुविधा उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या. चौपाटीवर येणाऱ्या नागरिकांना खाडी किनाऱ्याचा आनंद घेताना काही काळ निवांत बसता यावे, यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था करण्याबाबतही खासदारांनी प्रशासनाला निर्देश दिले.
तरुणाईकडे विशेष लक्ष
तरुणाईला आकर्षित करण्यासाठी चौपाटीवर विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॉक्स क्रिकेट, पिकल बॉल, कबड्डी आणि स्केटिंग रिंग यांसारख्या खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याबाबत डॉ. शिंदे यांनी सूचना केल्या. नागरिकांना नियमित व्यायाम, चालणे आणि धावण्याचा आनंद घेता यावा, यासाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्याच्या सूचनादेखील त्यांनी प्रशासनाला दिल्या. रेतीबंदर चौपाटीचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर मुंब्रा परिसरातील नागरिकांना खाडी किनारी विरंगुळा, क्रीडा आणि मनोरंजनाचा एकत्रित अनुभव देणारे नवे सार्वजनिक ठिकाण मिळणार आहे.
स्थानिकांसोबत रंगला व्हॉलीबॉलचा डाव
मुंब्रा रेतीबंदर चौपाटीच्या पाहणीसाठी गेलेल्या खासदार शिंदे यांना स्थानिक तरुणांचा व्हॉलीबॉलचा डाव पाहून मैदानात उतरण्याचा मोह आवरता आला नाही. काही स्थानिक युवा खेळाडू व्हॉलीबॉल खेळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तरुणांचा उत्साह पाहून त्यांनीही थेट मैदानात उतरून त्यांच्यासोबत व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेतला. त्यांच्यासोबत खासदार नरेश म्हस्के, ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त मनीष जोशी आणि प्रशांत रोडे यांनीही व्हॉलीबॉलच्या खेळात सहभाग घेतला. खासदारांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या खेळाविषयी, तसेच परिसरातील क्रीडा सुविधांबाबतही माहिती घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.