अवयवदानानंतर कौतुकासह अवमानही!
दानशूर कुटुंबीयांबाबत समाजात कुजबूज अन् संशय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : नातलगांना गमावण्याचे अपार दुःख डोक्यावर असताना कुटुंबीयांनी अवयवदानाचा स्तुत्य निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाबाबत समाजातून कौतुकही झाले; पण काही जवळच्या व्यक्तींकडूनच या निर्णयाकडे संशयित नजरेने पाहिले जाते. प्रसंगी त्यांचे टोमणे सहन करावे लागते; मात्र या पलीकडे जाऊनही अवयवदानामुळे दुसऱ्याला नवे आयुष्य मिळू शकते, या भावनेतून अनेक कुटुंबे अवयवदानाचा निर्णय घेत आहेत.
वसई येथील सत्यम दुबे (वय २४) आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य. दहा महिन्यांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. मुलाला गमावल्याचे दुःख असतानाही त्याच्या अवयवांमुळे इतर गरजू रुग्णांना जीवन मिळावे, यासाठी आई-वडिलांनी अवयवदानास संमती दिली; मात्र या निर्णयानंतर त्यांना समाजातील वेगवेगळ्या प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले. ‘एकुलता एक मुलगा होता, मग अवयवदान कसे केले?’ असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. तर काहींनी अवयवदानामागे आर्थिक फायदा असल्याचा संशयही व्यक्त केला. या कुजबुजीने मुलगा गमावलेल्या आई-वडिलांना आपल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देणेही मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे.
दुसऱ्या मुलाच्या मृत्यूनंतर अवयवदान
पनवेलच्या रूपचंद राठोड यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. दोन्ही मुलांनी एमबीएचे शिक्षण घेतले होते. २०१९ मध्ये मोठ्या मुलाचे लग्न ठरले असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर गेल्या वर्षी जानेवारीत धाकटा मुलगा स्वप्नीलचा स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. या वेळी वडिलांनी त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. ‘अवयवदानाचे महत्त्व आधी समजले असते, तर मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतरही हा निर्णय घेतला असता,’ अशी भावना राठोड यांनी व्यक्त केली; मात्र स्वप्नीलच्या मुलांच्या भविष्याची चिंता त्यांना सतावत आहे.
गावाकडून मानवंदना; शहरात प्रश्नांची सरबत्ती
प्रवीण चन्ने यांच्या कुटुंबानेही त्यांच्या मृत्यूनंतर यकृत, मूत्रपिंड आणि डोळे दान केले. त्यांच्या या निर्णयाला गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वासिंद येथे अंत्ययात्रेत अवयवदात्याला मानवंदना देण्यात आली. एका बाजूला समाजाकडून मिळालेला हा सन्मान, तर दुसरीकडे शहरात कुटुंबीयांना संशय आणि गैरसमजांना सामोरे जावे लागते, अशी विरोधाभासी परिस्थिती दिसून येते.
-----
एखाद्या कुटुंबाने दुःखदप्रसंगी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयाकडे संशयाने पाहण्याऐवजी त्यामागची भावना समजून घेण्याची गरज आहे. हा पैशाचा व्यवहार नसून माणुसकीचे नाते जोडण्याचा आणि समाजऋण फेडण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. एस. के. माथूर, अध्यक्ष, झेडटीसीसी
---
अवयवदानासाठी कुटुंबाची संमती मिळविण्यापासून ते अवयवदानानंतरच्या मानसिकतेपर्यंत समुपदेशन महत्त्वाचे ठरते. मुंबईतील झेडटीसीसी अशा कुटुंबांचे समुपदेशन करते. सुरुवातीला विरोध करणारे कुटुंबीयही समुपदेशनानंतर अवयवदानास तयार होतात.
- ऊर्मिला महाजन, झेडटीसीसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.