वज्रेश्वरी, ता. ३१ (बातमीदार) : अंबाडी येथे अपर तहसीलदार कार्यालय सुरू करून स्वतंत्र तालुका निर्मिती करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अंबाडीला तालुक्याचा दर्जा मिळाल्यास विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना दूरच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. प्रशासन नागरिकांच्या अधिक जवळ येईल. या पार्श्वभूमीवर कृती समितीने अंबाडी तालुकानिर्मितीमुळे होणारे १७ महत्त्वाचे फायदे सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहेत.
स्वतंत्र तालुका झाल्यास अंबाडीला प्रशासकीय ओळख मिळण्याबरोबरच महसूल विभागाच्या सेवा अधिक गतिमान होतील. जमीनविषयक नोंदी, हक्क, वाद आणि अन्य महसुली प्रकरणांचा निपटारा स्थानिक पातळीवर जलद होण्यास मदत होईल. पंचायत समिती, कृषी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, मलेरिया; तसेच साथीचे रोग नियंत्रण विभागाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय सुविधा, पशुधन व पशुवैद्यकीय सेवा, जनावरांचा विमा, कृषी योजनांची अंमलबजावणी, फळबाग विकास आणि पीकविमा यांचा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळू शकतो. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियमित भेटींमुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास, तसेच विकासकामांना गती मिळण्यास मदत होईल. परिसरात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी वाढण्याबरोबरच जमीन व मालमत्तांच्या किमतींनाही चालना मिळू शकते. भविष्यात दिवाणी न्यायालयाची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो. दरम्यान, कृती समितीचे अध्यक्ष शरद पाटील, मोहन पाटील, सचिव सुदाम पाटील, माजी महसूल अधिकारी एन. वाय. पाटील, आर. जी. पाटील, आत्माराम पाटील, बंटी पाटील, चिकू पाटील आणि संतोष पाटील यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
स्वतंत्र नगर परिषदेचा दर्जा
अंबाडी, झिडके, उंबरपाडा आणि कोपरोली परिसराचा एकत्रित विकास होऊन भविष्यात नगर परिषद दर्जा मिळण्याच्या दृष्टीनेही तालुकानिर्मिती महत्त्वाची ठरणार आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, गटारे, दिवाबत्ती तसेच आदिवासी आणि दलित वस्ती सुधारणा यांसाठी अधिक निधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
पर्यटन विकासाला चालना
अकलोली कुंड, वज्रेश्वरी देवस्थान आणि गणेशपुरी येथील स्वामी नित्यानंद महाराज मंदिर या धार्मिक व पर्यटनस्थळांच्या विकासालाही तालुका निर्मितीमुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळकटी मिळून भविष्यात विकासाला नवी दिशा मिळू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.