ठाणे शहर, ता. ३० : दिव्यात खाडीपात्र आणि कांदळवन क्षेत्रात बेकायदा कचरा व बांधकामाचा राडारोडा टाकून मोठ्या प्रमाणात भराव केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा कचरा मुंबई महापालिका क्षेत्रातील असल्याची कबुली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) राष्ट्रीय हरित लवादात दिली आहे. या भरावासाठी ठाणे महापालिकेने कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे. मुंबईतील बांधकामाचा राडारोडा दिवा खाडीत टाकला जात असतानाही ठाणे महापालिका बघ्याची भूमिका घेत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पर्यावरण संरक्षण संस्था ‘वनशक्ती’चे संचालक स्टॅलिन डी. यांनी याबाबत राष्ट्रीय हरित लवाद आणि किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. त्यांच्या माहितीनुसार, दिवा-मुंब्रा भागातील तब्बल १०३ हेक्टर कांदळवन क्षेत्र बेकायदा भरावामुळे नष्ट झाले आहे. गणेश पाटील आणि भाजपचे मुंब्रा मंडळ संघटक अध्यक्ष मोहम्मद इराकी यांच्या तक्रारीनंतर वन विभागानेही या परिसराची पाहणी केली.
दिवा परिसरातील विविध भूखंडांवर कचरा आणि मलबा टाकून भराव करण्याचे काम सुरू असल्याचे पाहणीत आढळले. १६ एप्रिल रोजी एमपीसीबी आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त पाहणीत डम्परमधून कचरा उतरवून जेसीबी आणि डोझरच्या मदतीने जमीन सपाट केली जात असल्याचे दिसून आले. हा भराव कांदळवनापासून अवघ्या ५० मीटर अंतरातील भागात तसेच खाडीपात्रात होत असल्याचे अहवालात नमूद आहे. खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात मलबा आणि कचरा टाकल्यामुळे परिसरातील नैसर्गिक नाले बुजण्याचा धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यात दिवा परिसरात पाणी साचून पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तहसीलदारांकडून कारवाईची अपेक्षा
कांदळवन क्षेत्रालगतच्या खासगी जमिनी आणि संरक्षित क्षेत्राच्या आसपास सुरू असलेल्या बेकायदा भरावावर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. त्यामुळे कांदळवन कक्षाचे विभागीय वन अधिकारी डी. पी. खाडे आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ठाणे तहसीलदारांना पत्र देऊन संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
लवादाच्या आदेशानंतर कारवाई
‘वनशक्ती’ने दाखल केलेल्या मूळ याचिकेनुसार, या प्रकरणात ३० जून रोजी लवादाने आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १३ ऑगस्ट रोजी प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रामध्ये कांदळवणांचा ऱ्हास होत असल्याची कबुली देण्यात आली; मात्र त्यापूर्वी २८ जुलै रोजी मंडळाने ठाणे पालिकेला पत्र पाठवून मुंबई किंवा ठाणे परिसरातील जुना कचरा तसेच बांधकामाचा राडारोडा खाडीपात्रात टाकणे तातडीने थांबविण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदतही आता संपली आहे.
सरकारी कांदळवन सुरक्षित
तक्रारीत नमूद केलेल्या स.क्र. २३६, १३४ आणि २७३ या सरकारी कांदळवनाच्या जमिनींवर सध्या डम्पिंग झालेले नसल्याचे वन विभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. या जमिनी वन विभागाच्या ताब्यात सुरक्षित आहेत; मात्र लगतच्या खासगी स.क्र. १५२ आणि अन्य भूखंडांवर मोठ्या प्रमाणात कचरा व मलब्याचा भराव करून कुंपण उभारण्यात आल्याचे पाहणीत आढळले आहे.
वनशक्ती करणार पाहणी
मुंबईतील राडारोडा ठाण्यात येत असतानाही महापालिका बघ्याची भूमिका का घेत होती, असा सवाल वनशक्तीने उपस्थित केलेला आहे. मुंब्रा, दिवा खाडीकिनारा आणि येथील कांदळवने हे शहराचे फुप्फुस आहे; मात्र वर्षानुवर्षे त्यावर भराव टाकला जात असून खाडीचा श्वास कोंडण्यात येत आहे. त्यामुळे एकेकाळी मासेमारी होत असलेला हा परिसर बकाल बनला असून येथील गावठाणेही धोक्यात आली आहेत. दरम्यान, कारवाईसाठी तीन आठवड्यांची दिलेली मुदत संपली असून ठाणे महापालिकेने यासंदर्भात काय पावले उचलली आहेत, याची पाहणी लवकरच करणार असल्याचे वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी ‘सकाळ’ला माहिती देताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.