सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधून दररोज निर्माण होणाऱ्या टनावारी कचऱ्याची उचल करून त्याची विल्हेवाट लावण्याची महापालिकेची पद्धत आता बदलणार आहे. दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या बल्क वेस्ट जनरेटर्सना स्वतःच्या परिसरातच कचऱ्यावर प्रक्रिया करावी लागणार आहे. ओला कचरा सोसायटीच्या आवारातच प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्याची जबाबदारी संबंधित सोसायट्यांवर सोपविण्यात येणार आहे. मार्च २०२७ पासून या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.
ठाण्यातील मोठ्या सोसायट्यांमधून दररोज निर्माण होणारा कचरा पालिकेच्या यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरत आहे. कचरा उचलण्यासाठी वाहने, चालक, सफाई कर्मचारी आणि त्यानंतर प्रक्रिया केंद्रांपर्यंत वाहतूक यावर पालिकेचा मोठा खर्च होतो. त्यामुळे कचरा निर्माण करणाऱ्यानेच त्याची प्राथमिक विल्हेवाट लावावी, या धोरणानुसार बल्क वेस्ट जनरेटर्सवर जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या प्राथमिक अंदाजानुसार ठाणे शहरात दररोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणारे सुमारे ८०० बल्क वेस्ट जनरेटर्स आहेत. मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या हा त्यातील प्रमुख घटक आहे. या सर्वांची नोंदणी करून त्यांच्याकडून कचरा प्रक्रिया व्यवस्था उभारून घेण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे.
सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या माध्यमातून संबंधित सोसायट्यांना सूचना दिल्या जात असून, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत सुमारे ४२७ बल्क वेस्ट जनरेटर्सची नोंदणी पूर्ण झाली आहे. म्हणजेच अपेक्षित संख्येच्या जवळपास निम्मे घटक प्रशासनाच्या नोंदणी प्रक्रियेत आले आहेत. मात्र, नोंदणीचा आकडा समाधानकारक असला तरी प्रत्यक्ष कचरा प्रक्रिया सुरू झाली आहे का, हा प्रश्न कायम आहे.
सोसायट्यांना त्यांच्या आवारातील जागेनुसार प्रक्रिया यंत्रणा उभारावी लागणार आहे. ओला आणि सुका कचरा सुरुवातीपासूनच स्वतंत्र करणे, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे आणि त्यातून तयार होणाऱ्या खताचा वापर करणे, ही संपूर्ण प्रक्रिया सोसायटी पातळीवर करणे अपेक्षित आहे.
दरम्यान, मोठ्या सोसायट्यांमधील ओला कचरा दररोज पालिकेच्या वाहनांद्वारे उचलून प्रक्रिया केंद्रांपर्यंत नेला जातो. त्यामुळे वाहनांची संख्या, इंधन, मनुष्यबळ आणि वाहतूक यावर मोठा खर्च होतो. हजारो किलो कचरा सोसायटीच्या पातळीवरच हाताळला गेल्यास पालिकेच्या संपूर्ण कचरा व्यवस्थापन साखळीवरील भार कमी होण्याची शक्यता आहे. मार्च २०२७ नंतर किती सोसायट्यांवर कारवाई होते आणि किती सोसायट्या प्रत्यक्ष कचरा प्रक्रिया सुरू करतात, यावर या मोहिमेचे यश अवलंबून राहणार आहे. कागदावरची नोंदणी आणि प्रत्यक्षातील कचरा प्रक्रिया यातील अंतर कमी करणे, हेच महापालिकेसमोरील खरे आव्हान ठरणार आहे.
मार्चनंतर ‘कागदी’ नोंदणी चालणार नाही
महापालिकेने प्रक्रिया यंत्रणा उभारण्यासाठी मार्च २०२७ पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे पुढील काळात केवळ नोंदणी पूर्ण करण्याऐवजी प्रत्यक्ष प्रक्रिया युनिट उभारण्यावर महापालिकेला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मुदत संपल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बल्क वेस्ट जनरेटर्सवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या नोंदणी झालेल्या ४२७ सोसायट्यांसह उर्वरित सुमारे ४०० घटकांसमोर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीचे आव्हान आहे.
प्रभाग समिती नोंदणी केलेल्या सोसायटी
दिवा ३३
मुंब्रा १६
कळवा १३
वागळे २८
नौपाडा कोपरी २९
लोकमान्य सावरकर नगर ३०
माजिवडा-मानपाडा १५०
वर्तकनगर १०२
उथळसर २६