माहिती फलकांना पार्किंगचा विळखा
वन विभागाच्या निसर्ग साक्षरता उपक्रमाला बेशिस्त वाहनांमुळे अडथळा; प्रवेशद्वारावर फाटक बसवण्याची मागणी
श्रीवर्धन, ता. ३० (वार्ताहर) : नयनरम्य समुद्रकिनाऱ्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या श्रीवर्धन येथे निसर्ग साक्षरता वाढविण्यासाठी वन विभागाने उभारलेल्या माहिती फलकांना बेकायदा पार्किंगचा विळखा पडला आहे. समुद्रकिनाऱ्याच्या परिसरातील वन विभागाच्या जागेत पर्यटक वाहने बेशिस्तपणे उभी करीत असल्याने जलचर, वन्यजीव, दुर्मिळ फुलपाखरे, फुले आणि विविध पक्ष्यांची माहिती देणारे आकर्षक फलक वाहनांआड झाकले जात आहेत. त्यामुळे वन विभागाच्या स्तुत्य उपक्रमाचा उद्देशच बाधित होत असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला मिळालेले ‘ब्लू फ्लॅग बीच’ हे मानांकन कायम ठेवण्यासाठी वन विभागाच्या सर्व्हे नं. ३६० मधील जागेवर स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि सुरक्षेच्या दृष्टीने ‘वन पर्यटन प्रकल्प’ राबविण्यात आला आहे. पर्यटकांना तालुक्यातील दुर्मिळ गिधाडे, धनेश, समुद्री घार यांसह विविध पक्षी आणि वन्यजीवांची माहिती मिळावी, तसेच पक्षी निरीक्षण व संवर्धनाला चालना मिळावी, या उद्देशाने हे फलक उभारण्यात आले आहेत; मात्र वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमुळे फलक दिसत नसल्याने प्रकल्पावर झालेला खर्च आणि त्यामागील उद्देश व्यर्थ ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रवेशद्वारावर फाटकाची मागणी
वाहनांना वन विभागाच्या जागेत प्रवेश मिळू नये, यासाठी प्रवेशद्वारालगत फाटक बसवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्या पर्यटकांवर वन विभागाने कारवाई करावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. माहिती फलकांचा परिसर वाहनमुक्त केल्यास पर्यटकांना निसर्ग आणि जैवविविधतेची माहिती सहज पाहता येईल आणि वन विभागाच्या या उपक्रमाचा मूळ उद्देश साध्य होण्यास मदत होईल.
प्रतिक्रिया :
समुद्रकिनारी लावलेले माहिती फलक पर्यटकांच्या प्रबोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यासमोर गाड्या पार्क करून फलक झाकणे चुकीचे आहे. आम्ही या जागेची तत्काळ पाहणी करून पार्किंग रोखण्यासाठी सूचना फलक लावणार आहोत. यानंतरही बेकायदा पार्किंग आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- स्वप्नील चंबुले, वनपरिक्षेत्र अधिकारी, श्रीवर्धन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.