नवी मुंबईत डिजिटल अरेस्ट, टास्क फ्रॉडच्या घटनांत वाढ
नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० : आधुनिक व आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात आता उच्च तंत्रज्ञानावर आधारित सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नवी मुंबई सायबर सेलकडे नोंदवलेल्या तक्रारींनुसार शहरात डिजिटल अरेस्ट, पार्ट टाईम जॉब/टास्क फ्रॉड आणि बनावट बँक खात्यांचा वापर करून नागरिकांची कोट्यवधींची आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर आले आहे.
नवी मुंबईतील अनेक उच्चशिक्षित नोकरदार, निवृत्त अधिकारी आणि महिलांना व्हॉट्सॲप अथवा स्काईप व्हिडिओ कॉलद्वारे लक्ष्य केले गेले. तुमच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले आहेत किंवा तुमच्या बँक खात्याचा वापर मनी लाँडरिंगमध्ये झाला आहे, अशी भीती दाखवून भामट्यांनी स्वतःला सीबीआय, कस्टम्स किंवा केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी भासवले आणि पीडितांना २४ ते ७२ तास कॅमेऱ्यासमोर डिजिटल अरेस्ट ठेवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची रक्कम उकळल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. यूट्युब व्हिडिओ लाईक करणे, हॉटेल्सना रेटिंग देणे किंवा टेलीग्रामवर टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली तरुणाई आणि गृहिणींना फसवल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.
सुरुवातीला काही १०० रुपयांचा परतावा देऊन विश्वास संपादन केला जातो आणि नंतर प्रीमियम टास्क किंवा क्रिप्टो ट्रेडिंगच्या जाळ्यात ओढून एकाच व्यक्तीकडून ५० हजार ते २५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम उकळली जात आहे. सायबर गुन्ह्यांमधून गोळा केलेला पैसा तातडीने वळवण्यासाठी पनवेल, कामोठे आणि ठाणे परिसरातील गरीब किंवा असंघटित क्षेत्रातील मजुरांच्या नावावर बनावट बँक खाती उघडली जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या खात्यांचा वापर करून कोट्यवधींचे अवैध व्यवहार पार पाडले जात आहेत. सायबर गुन्ह्यांबरोबरच उरण, द्रोणागिरी आणि जेएनपीए आंतरराष्ट्रीय बंदर परिसरात संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सागरी मार्गाने होणारी अवैध वाहतूक, अमली पदार्थांची तस्करी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेता सागरी पोलिस, तटरक्षक दल आणि सीआयएसएफकडून विशेष गस्त घातली जात आहे.
पोलिस प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन
कोणतीही कायदेशीर किंवा तपास यंत्रणा व्हिडिओ कॉलवरून डिजिटल अरेस्ट करीत नाही. असा कॉल आल्यास घाबरून न जाता तत्काळ फोन कट करा. तपासणी किंवा व्हेरिफिकेशनच्या नावाखाली कोणत्याही अनोळखी खात्यावर पैसे पाठवू नका. सायबर फसवणूक झाल्यास पहिल्या एका तासात राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० वर किंवा अधिकृत वेबसाईटवर तक्रार नोंदवा. यामुळे फसवणुकीची रक्कम फ्रीझ करणे शक्य होते.
नवी मुंबई व पनवेल परिसरातील पाच वर्षांची तुलनात्मक आकडेवारी
वर्ष एकूण तक्रारी पार्ट टाईम टास्क फ्रॉड प्रकरणे फसवणुकीची अंदाजे रक्कम
२०२१ १,२०० १५० ० १५ कोटी
२०२२ २,८०० ४५० ० ते २ ३८ कोटी
२०२३ ५,५०० १,४०० १५ ८५ कोटी
२०२४ ८,२०० २,६०० ७५ १४५ कोटी
२०२५ ११,५०० ४,१०० १८० २१० कोटी
नोडनुसार गुन्ह्यांचे स्वरूप आणि विश्लेषण
नवी मुंबई परिमंडळ (वाशी, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर, ऐरोली) :
डिजिटल अरेस्टचा मोठा फटका : या पट्ट्यात आयटी नोकरदार, उच्चशिक्षित आणि निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या जास्त असल्याने सीबीआय, कस्टम्स व ईडीच्या नावाने स्काईप व व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून भामट्यांकडून डिजिटल अरेस्ट करण्याचे गुन्हे येथे सर्वाधिक घडले.
आर्थिक नुकसान : या भागात एकाच गुन्ह्यात २० लाख ते २.५ कोटींपर्यंतची मोठी रक्कम लांबवल्याच्या घटना घडल्या आहेत.
पनवेल परिमंडळ (खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, तळोजा) :
टास्क व जॉब फ्रॉडचे जाळे : खारघर, कामोठे आणि तळोजा या वेगाने वाढणाऱ्या नोड्समध्ये तरुण, विद्यार्थी, गृहिणी आणि मध्यमवर्गीय नागरिकांना घरबसल्या कमवा, यूट्युब व्हिडिओ लाईक करा किंवा हॉटेल रेटिंग द्या अशा प्रलोभनाने जाळ्यात ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
बनावट बँक खाती : पनवेल व लगतच्या औद्योगिक/ग्रामीण पट्ट्यात सायबर गुन्हेगारांनी मजुरांच्या व स्थानिकांच्या नावे कमिशन देऊन उघडलेल्या बनावट बँक खात्यांचा वापर करून फसवणुकीची रक्कम वळवण्याचे प्रकार तपासात उघडकीस आले आहेत.
पाच वर्षांतील मुख्य बदल गुन्ह्यांच्या पद्धतीत बदल
२०२१ मध्ये फसवणूक प्रामुख्याने क्रेडिट कार्ड ओटीपी, लॉटरी आणि साध्या बँक डिटेल्सपुरती मर्यादित होती. २०२३ नंतर डिजिटल अरेस्ट आणि टेलिग्रामवरील टास्क फ्रॉडचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. नवी मुंबई सायबर सेलच्या तपासात उघड झाले आहे, की खारघर व वाशी परिसरातील नागरिकांना गंडा घालणारे प्रमुख सर्व्हर व सायबर सिंडिकेट्स हे आग्नेय आशियातील देशांमधून (कंबोडिया, म्यानमार) ऑपरेट केले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.