गणेशोत्सवासाठी पोयनाड बाजारपेठ सज्ज
सजावट साहित्यापासून किराणा मालापर्यंत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
पोयनाड, ता. ३० (बातमीदार) : अवघ्या १४ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग तालुक्यातील पोयनाड बाजारपेठ सज्ज झाली आहे. सजावटीचे साहित्य, शोभेच्या वस्तू, कागदी फुलांच्या माळा, रंगीत कागद, गुच्छ, तोरणे तसेच पर्यावरणपूरक मखरांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. कोळघर, ताडवागळे, सांबरी, कुर्डूसपासून हाशिवरेपर्यंतच्या गावांतील नागरिक खरेदीसाठी पोयनाडमध्ये गर्दी करीत आहेत. यंदा स्वदेशी अर्थात ‘मेक इन इंडिया’ वस्तूंच्या वापरावरही नागरिकांचा भर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी लागणारा तांदूळ, तेल, साखर, रवा, बेसन, कडधान्ये आणि मोदकाचे पीठ यासह किराणा मालाचाही मुबलक साठा दुकानदारांनी केला आहे. साखरेच्या दरात वाढ झाली असली तरी तिच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ताजे हार आणि फुलांनाही मोठी मागणी असल्याने त्यांचीही मोठ्या प्रमाणात उपलब्धता करण्यात येणार आहे. ग्राहकांना खरेदीदरम्यान अडचण येऊ नये, यासाठी वाहतूक नियोजन व पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. गोपाळकाल्यानंतर पुढील आठवडाभर बाजारपेठेत गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
सुगंधी अगरबत्तीला पसंती
पोयनाड बाजारपेठेतील दुकानदारांनी विविध प्रकारच्या अगरबत्ती विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. आकर्षक सुगंध, विविध प्रकार आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या अगरबत्तींना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूजेसाठी लागणारे साहित्य एकाच बॉक्समध्ये उपलब्ध करून देणाऱ्या संचांचीही मागणी वाढली आहे.
स्वदेशी वस्तूंचा वाढता वापर
यंदाच्या गणेशोत्सवात स्वदेशी वस्तूंच्या वापराला नागरिकांकडून प्राधान्य दिले जात आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सजावटीचे बल्ब, तोरणे आणि अन्य साहित्यामध्ये भारतीय बनावटीच्या वस्तूंना मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
छायाचित्र :
पोयनाड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या पूजेचे सामान उपलब्ध झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.