कॅनव्हासवर उमलला निसर्गरम्य कोकण
गॅलरी एफपीएचमध्ये ममता चिटणीस यांच्या ‘रूरल डिलाईट्स’ची कलारसिकांना भुरळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : हिरवेगार निसर्गसौंदर्य, लाल मातीचा सुगंध आणि संथ ग्रामजीवन... वेगाने बदलणाऱ्या शहरीकरणाच्या प्रक्रियेत लुप्त होत चाललेला कोकणचा हाच समृद्ध वारसा मुंबईतील कला रसिकांना सध्या भुरळ घालत आहे. ज्येष्ठ लेखिका आणि चित्रकार ममता चिटणीस-सेन यांच्या ‘रूरल डिलाईट्स’ या एकल चित्रप्रदर्शनातून कोकणचे निसर्गसौंदर्य, ग्रामीण जीवन आणि त्यापुढील आव्हाने प्रभावीपणे कॅनव्हासवर साकारली आहेत. नरीमन पॉइंट येथील गॅलरी एफपीएचमध्ये सुरू असलेल्या या प्रदर्शनाला कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ममता यांनी ॲक्रेलिक रंगांसोबत प्रामुख्याने ‘पॅलेट नाईफ’ तंत्राचा प्रभावी वापर केला आहे. रंगांचे विविध थर आणि ठळक रंगछटांमुळे चित्रांना उठाव मिळाला असून, त्यातून कोकणचा निसर्ग जिवंत भासतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गसंपदेसोबतच वाढत्या शहरीकरणामुळे या प्रदेशाच्या पर्यावरणावर निर्माण होणारा धोका त्यांनी संवेदनशीलतेने मांडला आहे.
‘काली इन रोझ बुश’, ‘रुक्मिणी इन फ्लोरा’ आणि ‘माय लँड, माय लाइफ’ या कलाकृती विशेष लक्षवेधी ठरत आहेत. चित्रांमधील महिलांचे चेहरे हे केवळ व्यक्तिचित्रण न राहता कोकणातील परंपरा, श्रम आणि सहनशीलतेचे प्रतीक म्हणून समोर येतात. विविध ऋतूंनुसार निसर्गातील बदलणाऱ्या रंगछटाही त्यांनी बारकाईने टिपल्या आहेत.
“माझी चित्रे केवळ निसर्गाचे प्रतिबिंब नसून निसर्ग आणि मानवी अस्तित्वातील घट्ट नाते अधोरेखित करतात,” अशी भावना ममता चिटणीस यांनी व्यक्त केली.
१६ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या प्रदर्शनाला कलाक्षेत्रातील मान्यवरांसह रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरीकरणाच्या वेगात आपण कोणता निसर्गरम्य वारसा गमावत आहोत, याचा अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे हे प्रदर्शन कलाप्रेमींसाठी विशेष पर्वणी ठरत आहे.
कलारसिकांच्या प्रतिक्रिया
“ऋतूंचे रंग मनमोहक”
“ममता यांच्या चित्रांमधून कोकणातील विविध ऋतूंमधील रंगबदल अतिशय सुंदररीत्या प्रकट होतात. शेते, झाडे आणि शेतकरी स्त्रियांचे सादरीकरण मनाला आनंद देणारे आहे.”
- डॉ. प्रदीप मिराशी
“चित्रांमधून ग्रामीण जीवनाचा अनुभव”
“कॅनव्हासवरील प्रत्येक चित्र निसर्गाच्या ऊर्जेने ओसंडून वाहते. शांत समुद्रकिनारा, एकाकी होडी आणि भव्य केळीची झाडे आपल्याला थेट साध्या-सोप्या ग्रामीण आयुष्यात घेऊन जातात.”
— रेश्मा शेठ
“कोकणात फिरून आल्याचा भास”
“चित्रांमधील रंगसंगती मनाला भुरळ घालते. कोकणातील घरे, देवळे आणि पाऊलवाटा पाहताना प्रत्यक्ष कोकणात फिरून आल्याचा भास होतो.”
— उल्का शर्मा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.