पंकज रोडेकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाण्याच्या सिमेंटच्या जंगलात माणसांचीच नव्हे, तर मुक्या जीवांचीही धावपळ सुरू आहे. कुठे गच्चीवर अडकलेली मांजर, कुठे रस्त्यावर जखमी झालेला श्वान, तर कुठे संकटात सापडलेला पक्षी, अशा वेळी मदतीसाठी पुढे येणाऱ्या नागरिकांमुळे आणि रेस्क्यू पथकांमुळे अनेक जीवांना नवजीवन मिळत आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत ८९ प्राणी आणि ८१ पक्ष्यांची, म्हणजेच एकूण १७० जीवांची सुखरूप सुटका करण्यात आली.
विशेष म्हणजे, या घटनांमध्ये ‘वाघाची मावशी’ म्हणून ओळखले जाणारे मांजर आणि श्वानांना मदतीच्या घटना सर्वाधिक आहेत. मानवी वस्तीत वावरताना अडचणीत सापडलेल्या या प्राण्यांसाठी अनेकदा नागरिकांनी तत्काळ मदत मागितली आणि रेस्क्यू पथकांनीही घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली.
जानेवारीत पक्ष्यांचा ‘रेस्क्यू’ सर्वाधिक
जानेवारीत तब्बल ३१ पक्ष्यांना मदत मिळाली. याच महिन्यात १४ प्राण्यांची सुटका झाली. फेब्रुवारीत १३ प्राणी आणि १२ पक्षी, मार्चमध्ये १३ प्राणी आणि १४ पक्षी, तर एप्रिलमध्ये ११ प्राणी आणि चार पक्ष्यांची सुटका करण्यात आली.
मे ठरला प्राण्यांसाठी सर्वाधिक धावपळीचा
मेमध्ये प्राण्यांच्या मदतीच्या घटनांनी सर्वाधिक संख्या गाठली. या महिन्यात २० प्राणी आणि आठ पक्षी, अशा २८ जीवांना सुरक्षित करण्यात आले. जूनमध्ये सात प्राणी व सहा पक्षी, तर जुलैमध्ये ११ प्राणी व सहा पक्ष्यांना मदत मिळाली.
काँक्रीट वाढले; पण माणुसकीही
शहराचा विस्तार होत असताना प्राणी-पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास कमी होत आहे. परिणामी, ते मानवी वस्तीत येतात आणि अनेकदा संकटात सापडतात. अशा वेळी त्यांच्या मदतीसाठी नागरिकांनी दाखवलेली संवेदनशीलता ही ठाण्याच्या शहरी जीवनातील माणुसकीची सुखद बाजू ठरत आहे. माणसांसाठी धावणारे अनेक हात आपण पाहतो; पण मुक्या जीवांसाठी धावणारे हात हीच खरी ठाणेकरांची ‘जिवंत संवेदना’ आहे.
या मुक्या जीवांचा समावेश
मागील सात महिन्यांत कावळा, कबुतर, श्वान, मांजर, गाय, माकड, पोपट, घुबड, घार, बगळा, साप आदी मुक्या जीवांची अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप सुटका केली आहे.
एखाद्या घटनेसंदर्भात मदतीसाठी कक्षाला कॉल प्राप्त झाल्यानंतर आमचे कर्मचारी, ठाणे अग्निशमन केंद्राचे अधिकारी आणि फायरमन घटनास्थळी पोहोचून नागरिकांना मदत करतात आणि त्यांना संकटातून सुरक्षितपणे बाहेर काढतात. तसेच संकटात सापडलेल्या प्राणी व पक्ष्यांनाही मदत केली जाते.
- यासीन एम. तडवी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.