शिक्षण हब बनणाऱ्या खारघर-पनवेलमध्ये विद्यार्थ्यांची घुसमट
‘पीजी’चा मनमानी कारभार, सोसायट्यांचे ‘नो-स्टुडंट’ धोरण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : उच्च शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून वेगाने नावारूपास येत असलेल्या खारघर आणि पनवेल परिसराला राज्याची ‘एज्युकेशन हब’ म्हणून नवी ओळख मिळाली आहे. निफ्ट, एनएमआयएमएस, भारती विद्यापीठ, एमजीएम मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेज, पिल्लाई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, ॲमिटी युनिव्हर्सिटी आणि छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी अशा नामांकित संस्थांमुळे देश-परदेशातून हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात; मात्र या भरभराटीसोबतच परगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना निवासाच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अवाजवी भाडे आकारणारे अनधिकृत पेइंग गेस्ट चालक, रहिवासी सोसायट्यांचे कडक आक्षेप आणि पोलिसांची कडक तपासणी मोहीम यामुळे विद्यार्थ्यांची दुहेरी कोंडी होत आहे.
महाविद्यालयांच्या अधिकृत वसतिगृहांची क्षमता मर्यादित असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना खासगी पीजी किंवा भाड्याच्या फ्लॅटचा आधार घ्यावा लागतो. १ बीएचके किंवा २ बीएचके फ्लॅटमध्ये पाच ते आठ विद्यार्थ्यांना ठेवून खासगी एजंट प्रति विद्यार्थी आठ ते १५ हजार मासिक भाडे आणि अवाच्या सव्वा डिपॉझिट वसूल करतात. अनेक अनधिकृत पीजी व खासगी हॉस्टेलमध्ये खिडक्यांशिवाय अरुंद खोल्या, अपुरे स्वच्छतागृह आणि निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. विशेषतः परगावाहून येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी रात्रीच्या वेळी प्रवास करणे, सुरक्षित पीजी शोधणे आणि योग्य निवारा मिळवणे हे मोठे आव्हान ठरत आहे. खारघर आणि न्यू पनवेलमधील गृहनिर्माण सोसायट्या आणि विद्यार्थी यांच्यात वारंवार खटके उडत असल्याचे चित्र आहे. अनेक सोसायट्यांनी आपल्या उपविधींमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांना किंवा बॅचलर्सना घरे भाड्याने न देण्याचा एकतर्फी ठराव मंजूर केला आहे. रात्रीच्या वेळी होणारा आवाज, मित्र-मैत्रिणींच्या अनियंत्रित भेटी, लेट-नाईट पार्ट्या आणि सोसायट्यांच्या शांततेला बसणारे तडे यावर रहिवाशांचा मुख्य आक्षेप असतो. दोन आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगवरून, तसेच सोसायट्यांच्या स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करण्यावरून विद्यार्थ्यांशी वाद होतात. खारघर-पनवेलचे शैक्षणिक महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी सिडको, पालिका आणि शिक्षण संस्थांनी संयुक्तपणे अधिकृत स्टुडंट हॉस्टेल झोन विकसित करण्याची आणि खासगी पीजी चालकांसाठी भाडे नियंत्रण नियमावली लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
पोलिस तपासणी मोहीम आणि कायदेशीर बाबी
वाढत्या नागरीकरणासोबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नवी मुंबई पोलिस दलाने खारघर व पनवेल परिसरात विशेष मोहीम हाती घेतली आहे. सर्व घरमालक आणि पीजी चालकांना आपल्याकडे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आणि ओळखपत्रे जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करून चालवल्या जाणाऱ्या व्यावसायिक पीजी चालकांवर आणि पोलिस पडताळणी न करणाऱ्या घरमालकांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजकंटकांवर नजर ठेवण्यासाठी कॉलेज परिसर, सेक्टर १२, १५, ३५ खारघर आणि खांदा कॉलनी भागात पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे.
परिसरनिहाय समस्यांचे स्वरूप
१ एनआयएफटी आणि एनएमआयएमएस, भारती विद्यापीठ, वायसीएमओयू या शैक्षणिक संस्थांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी खारघर सेक्टर १२, १५, ३० ते ३५ भागात पीजींचे मोठे जाळे आहे. तर, काही रहिवासी सोसायट्यांचे कडक निर्बंध असल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे राहण्याची समस्या उद्भवली आहे.
२ न्यू पनवेल व खांदा कॉलनी या भागात पिल्लाई कॉलेज, सीएसएम युनिव्हर्सिटी व खासगी वसतिगृहांची संख्या जास्त आहे. पार्किंग व रात्रीच्या गोंधळावरून सोसायट्यांशी वाद निर्माण होत आहेत.
प्रशासकीय भूमिका व उपायांची गरज
सोसायट्यांनी विद्यार्थ्यांना सरसकट गुन्हेगार ठरवून घरे नाकारण्याऐवजी स्पष्ट नियमावली घालून द्यावी. त्याच वेळी घरमालकांनी भाडेकरूंची पोलिस पडताळणी करून घेणे कायद्याने आवश्यक आहे. अनधिकृतपणे राहणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट मत स्थानिक पोलिस प्रशासनाने व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.