डाऊ केमिकल्सविरोधात मनसेचा एल्गार
भूमिपुत्र कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक; कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय देण्याचे आश्वासन
पनवेल, ता. ३१ (बातमीदार) ः स्थानिक भूमिपुत्र कामगारांना बेकायदा कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने सोमवारी (ता. ३१) तळोजा येथील डाऊ केमिकल्स कंपनीविरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या सहकार्यादरम्यान पार पडलेल्या या मोर्चानंतर कंपनी व्यवस्थापन आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या वेळी मनसेचे महानगराध्यक्ष योगेश चिले, जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, महानगर उपाध्यक्ष सूरज गायकर, विभागाध्यक्ष विश्वनाथ पाटील, शाखाध्यक्ष अमोल पाटील तसेच कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. स्थानिक कामगारांच्या रोजगाराच्या प्रश्नावर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधींनी वेळ मागितला. संबंधित वरिष्ठ अधिकारी भारताबाहेर असल्याने त्यांच्याशी चर्चा करून पुढील बैठकीत निर्णय देण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले; मात्र मनसेने कंपनी व्यवस्थापनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत पुढील बैठकीत ‘होय किंवा नाही’ यापैकी स्पष्ट उत्तर हवे, अशी भूमिका मांडली. भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या प्रश्नावर मनसेची भूमिका ठाम असून, कंपनीची वाहने ज्या रस्त्यांवरून धावतात ते रस्ते जनतेचे आहेत, याची कंपनीने जाणीव ठेवावी, असा इशाराही या वेळी देण्यात आला. कंपनीने सकारात्मक निर्णय घेतल्यास त्याचे स्वागत केले जाईल; मात्र कामगारांवरील अन्याय कायम राहिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनसेने दिला. कंपनीच्या आश्वासनानंतर आजचा मोर्चा स्थगित करण्यात आला असून, पुढील बैठकीतील निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.