आतड्याच्या कर्करोगात आनुवंशिक धोका?
चार वर्षांतील तपासणीत १९ टक्के रुग्णांत जनुकीय बदल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : कमी वयात कर्करोगाचे निदान होणे किंवा कुटुंबात कर्करोगाची पुनरावृत्ती होणे, हे आनुवंशिक धोक्याचे महत्त्वाचे संकेत ठरू शकतात. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयातील चार वर्षांच्या नोंदींनुसार, आनुवंशिक तपासणी केलेल्या ७७९ कर्करोग रुग्णांपैकी १४७ जणांमध्ये (१८.९ टक्के) कर्करोगाशी संबंधित जनुकीय बदल आढळून आले आहेत. त्यामुळे विशिष्ट कर्करोग प्रकार आणि कौटुंबिक इतिहास असलेल्या रुग्णांत योग्य वेळी आनुवंशिक तपासणी करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
पोट आणि आतड्याच्या कर्करोगाच्या २८४ रुग्णांची तपासणी केली असता, ४४ जणांत (१५.५ टक्के) लिंच सिंड्रोमशी संबंधित जनुकीय बदल आढळले. तसेच स्तन आणि अंडाशयाच्या कर्करोगाशी संबंधित जनुकांची तपासणी केलेल्या ४९५ रुग्णांपैकी १०३ जण (२०.८ टक्के) पॉझिटिव्ह आढळले. लिंच सिंड्रोम ही आनुवंशिक स्थिती असून यामुळे कोलोरेक्टल तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. एखाद्या रुग्णामध्ये असा जनुकीय बदल आढळल्यास त्याच्या रक्ताच्या नातेवाइकांतही तो असण्याची शक्यता असते. त्यामुळे कुटुंबातील संबंधित सदस्यांची तपासणी आणि नियमित वैद्यकीय देखरेख महत्त्वाची ठरते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
मॉलिक्युलर पॅथॉलॉजीच्या सल्लागार डॉ. अमृत कौर कालेर यांच्या मते, कमी वयात कर्करोगाचे निदान झालेले रुग्ण किंवा कुटुंबातील अनेक सदस्यांना कर्करोग झाल्याचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी वेळीच आनुवंशिक तपासणीचा विचार करणे आवश्यक आहे. डॉ. मनोज मूलचंदानी यांनीही वयाच्या ५० वर्षांपूर्वी जठरांत्राच्या कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णांत तसेच कौटुंबिक इतिहास असलेल्या रुग्णांनी आनुवंशिक तपासणीचा विचार करण्याची गरज व्यक्त केली.
---
तपासणी केव्हा करावी?
प्रत्येक कर्करोग रुग्णाची सरसकट आनुवंशिक तपासणी केली जात नाही. कमी वयात कर्करोग होणे, कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असणे किंवा विशिष्ट प्रकारचा कर्करोग आढळणे, अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने ही तपासणी केली जाते. लिंच सिंड्रोमचा प्राथमिक संकेत मिळाल्यानंतर पुढील आनुवंशिक तपासणीद्वारे जन्मजात जनुकीय बदल निश्चित केला जातो. ऱ्या