पाणीपट्टी थकबाकीदारांना
चार महिन्यांची मुदत
व्याज, दंड १०० टक्के माफ; १ जानेवारीपासून नळजोडणी खंडित
सकाळ वृत्तसेवा
ठाणे ता. ३१ : पाणीपट्टीची थकबाकी वर्षानुवर्षे न भरता प्रशासनाचा महसूल बुडवणाऱ्या घरगुती ग्राहकांनाही आता महापालिकेने मोठा दिलासा दिला आहे. थकीत पाणी बिलावरील व्याज आणि दंडाची १०० टक्के माफी देण्याचा निर्णय घेत महापालिकेने थकबाकीदारांना तब्बल चार महिन्यांची मुदत दिली आहे. तसेच १ जानेवारीपासून नळजोडणी तोडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महापालिकेची ही योजना १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे. थकीत पाणी बिलाची संपूर्ण रक्कम आणि चालू आर्थिक वर्षाची मागणी एकरकमी भरणाऱ्या घरगुती नळजोडणीधारकांना थकबाकीवरील व्याज, दंड पूर्णपणे माफ केला जाणार आहे. विशेष म्हणजे सवलतीची मुदत संपल्यानंतर मात्र प्रशासनाने कठोर पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे. १ जानेवारी २०२७ नंतरही थकबाकी कायम राहिल्यास संबंधितांची नळजोडणी तोडून पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. व्यावसायिक ग्राहकांना मात्र या सवलतीचा लाभ मिळणार नाही.
दरम्यान, थकबाकीदारांना वारंवार सवलती जाहीर केल्याने नियमितपणे पाणीपट्टी भरणाऱ्या ग्राहकांच्या मनात नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेतून महापालिकेची थकबाकी किती वसूल होते, याकडे आता लक्ष लागले आहे.