उल्हासनगर, ता. १ (बातमीदार) : अनेक वर्षांपासून मुद्रांक शुल्काच्या प्रलंबित प्रकरणांमुळे अडचणीत सापडलेल्या उल्हासनगरातील हजारो नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने विशेष बाब म्हणून
शहरासाठी एक महिन्याच्या कालावधीसाठी अभय योजना लागू केली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी (ता. ३१) महसूल विभागाने जारी केला आहे.
उल्हासनगरात अनेक वर्षांपासून मालमत्तांच्या खरेदी-विक्री, हस्तांतरण, वारसा नोंदणी आणि दस्त नोंदणीशी संबंधित हजारो मुद्रांक शुल्क प्रकरणे प्रलंबित होती. त्यामुळे नागरिकांना दंड, व्याज आणि वाढीव शुल्काचा आर्थिक भार सहन करावा लागत होता. अनेक व्यवहार केवळ या कारणामुळे रखडले होते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आमदार कुमार आयलानी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करत उल्हासनगरसाठी विशेष अभय योजना लागू करण्याची मागणी केली होती. अखेर सरकारने ही मागणी मान्य करत शहरासाठी विशेष सवलतीचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना दंड व अधिभारामध्ये सरकारने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार सवलत मिळणार आहे.
प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणे नियमित करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मालमत्ता व्यवहारांना वेग येण्याबरोबरच हजारो कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरातील नागरिकांनी एक महिन्याच्या या विशेष मुदतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांचा निर्धारित कालावधीत निपटारा करावा, असे आवाहनही आयलानी यांनी केले आहे.
हजारो नागरिकांना दिलासा
सरकारच्या निर्णयानंतर आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. उल्हासनगरच्या नागरिकांच्या हितासाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दीर्घकाळ प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांमुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला अखेर यश मिळाले, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.