सायन्स पार्क २०२८ मध्ये खुले होणार
संथ कामामुळे मुदत उलटूनही प्रकल्प अपूर्ण; नवी मुंबईकरांची प्रतीक्षा वाढली
तुर्भे, ता. १ (बातमीदार) : पालिकेच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘सायन्स पार्क’ प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू असल्याने नवी मुंबईकरांची प्रतीक्षा आणखी वाढली गेली आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठरवून दिलेल्या मुदती एकापाठोपाठ एक उलटून गेल्यानंतरही प्रत्यक्ष काम पूर्ण झालेले नाही. आता इमारतीचे बाह्य बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सादरीकरणाच्या कामासाठी वर्कऑर्डर जारी करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत या अंतर्गत कामाला सुरुवात होणार असून, ते पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे हे सायन्स पार्क २०२८ मध्येच नागरिकांसाठी खुले होईल, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
नेरूळ येथील वंडर्स पार्कजवळ सुमारे ११ हजार ५०० चौरस मीटर बांधकाम क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायन्स पार्क उभारण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संकल्पना मनोरंजक व सोप्या पद्धतीने समजावून देणे, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे. विविध वैज्ञानिक मॉडेल्स, प्रकल्प, प्रतिकृती, ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमे आणि अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून ‘हसत-खेळत विज्ञान’ ही संकल्पना येथे साकारण्यात येणार आहे. त्यामुळे रखडलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून सायन्स पार्क नागरिकांसाठी खुले करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुदतीवर मुदतवाढ
महापालिकेने नोव्हेंबर २०२३ पर्यंत सायन्स पार्कचे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले होते; मात्र निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर मार्च २०२५पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पुढेही सुधारित मुदती देण्यात आल्या; मात्र प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे सायन्स पार्क प्रत्यक्षात नागरिकांसाठी कधी खुले होणार, हा प्रश्न कायम होता. आता अंतर्गत कामाला सुरुवात होणार असल्याने प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
पर्यटनाचे नवे आकर्षण
सायन्स पार्कमध्ये केवळ वैज्ञानिक उपकरणे आणि मॉडेल्सच नव्हे, तर भविष्यातील मानवी जीवन, ऊर्जा, पर्यावरण आणि सहजीवनाशी संबंधित विविध संकल्पना प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. त्यामुळे हे केंद्र नवी मुंबईतील पर्यटनाचे नवे आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे. नवी मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील तसेच राज्य आणि देशाच्या विविध भागांतील पर्यटक आणि विद्यार्थी येथे येण्याची शक्यता आहे.
सायन्स पार्कच्या इमारतीचे बाह्य काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत कामाची वर्कऑर्डर काढली असून, येत्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. अंतर्गत कामाची मुदत १८ महिन्यांची आहे. त्यामुळे हे सायन्स पार्क २०२८ मध्ये नागरिकांसाठी खुले होईल.
- भास्कर इसामे, उपअभियंता, नवी मुंबई पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.