‘जेन झी’च्या जोशासह महिला गोविंदांचा जल्लोष
प्रभादेवी दहीहंडी सराव शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभादेवी, ता. १ (बातमीदार) : ढोल-ताशांचा गजर, गोविंदांच्या घोषणांनी दुमदुमलेले वातावरण, थरावर थर रचण्याचा थरार आणि त्याला मिळालेली जेन झीची भन्नाट ऊर्जा... अशा उत्साहपूर्ण वातावरणात प्रभादेवीतील दहीहंडी सराव शिबिराला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपचे सचिन शिंदे यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली प्रभादेवी येथे सोमवारी (ता. ३१) दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात १५० हून अधिक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. सहभागी पथकांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
गेल्या सातपेक्षा अधिक वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या सराव शिबिर आता केवळ सरावाचे व्यासपीठ न राहता मुंबईच्या दहीहंडी संस्कृतीतील एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय उपक्रम म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यंदाच्या शिबिराचे विशेष आकर्षण ठरले ते महिला गोविंदांचा वाढता सहभाग आणि ‘जेन झी’चा जोश. या सराव शिबिराला मंत्री मंगलप्रभात लोढा, आशीष शेलार, विधानसभा उपसभापती सचिन अहिर, प्रसाद लाड, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, उपमहापौर संजय घाडी यांच्यासह भाजपा पदाधिकारी नीरज उभारे, शलाका साळवी यांनी उपस्थिती लावली. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सिद्धार्थ जाधव आणि संतोष जुवेकर यांच्या उपस्थितीने शिबिराला विशेष रंगत आली. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन यावर विशेष भर देण्यात आल्याचे आयोजक विशाल (बबन) तोडणकर आणि नारायण पवार यांनी सांगितले. ‘जेन झी’ची ऊर्जा आणि आपल्या दहीहंडीच्या परंपरेची ताकद यांचा संगम झाला, तर नव्या पिढीला संस्कृतीशी जोडतानाच टीम वर्क, शिस्त आणि सुरक्षिततेची मूल्येही देता येतील, असे सचिन शिंदे यांनी सांगितले.
समन्वय आणि संघभावनेचे दर्शन
पारंपरिक दहीहंडीला आधुनिक पिढीची ऊर्जा लाभल्याने संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. महिला गोविंदांनीही पुरुष गोविंदांच्या बरोबरीने सरावात सक्रिय सहभाग घेत आत्मविश्वास, समन्वय आणि संघभावनेचे दर्शन घडविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.