कांद्याच्या भावात तेजी कायम
घाऊक बाजारात ४०-४५ रु. किलो, दिवाळीपर्यंत भाव चढेच राहण्याची शक्यता
तुर्भे, ता. १ (बातमीदार) : एपीएमसी घाऊक बाजारात कांद्याच्या भावातील तेजी कायम असून, चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये भाव मिळत आहे. गेल्या आठवड्यात हाच भाव ३५ ते ४० रुपये किलो होता. अवघ्या काही दिवसांत झालेल्या या भाववाढीमुळे किरकोळ बाजारात कांदा ५५ ते ६० रुपये किलो झाला असून, आगामी सणासुदीच्या काळात गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट बिघडण्याची चिन्हे आहेत.
बाजारात कांद्याची आवक सातत्याने कमी होत असल्याने भावावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यातच चांगल्या प्रतीचा कांदा बाजारात तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने कांद्याच्या भावात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याला ४० ते ४५ रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भावात सुमारे १० रुपयांची वाढ झाली आहे. आवक आणखी कमी झाल्यास आगामी काळात भाववाढीचा वेग वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. परिणामी, किरकोळ बाजारात कांदा ५५-६० रु. किलो झाला असून दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव चढेच राहण्याची शक्यता आहे.
आवक घटल्याने भाववाढीला बळ
कांद्याच्या भाववाढीमागे कमी आवक आणि चांगल्या प्रतीच्या कांद्याची कमतरता ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. बाजारात नियमित आणि मुबलक आवक झाल्यास भाव काही प्रमाणात स्थिर होण्याची शक्यता आहे; मात्र सध्या आवक कमी असल्याने भावातील तेजी कायम आहे. घाऊक बाजारात सध्या चांगला कांदा फार कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ पाहायला मिळत असल्याचे व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले.
नाफेडच्या कांद्याची प्रतीक्षा
नाफेडकडून बाजार समित्यांमध्ये कांदा पाठवला जाणार आहे. तो कांदा आल्यास काही फरक पडू शकतो; मात्र येणाऱ्या कांद्याचा दर्जा कसा आहे यावर पुढचे गणित अवलंबून राहणार आहे. आतापर्यंत नाफेडचा आलेला कांदा फारसा चांगला आलेला नाही. त्यामुळे या कांद्याचा बाजारावर फारसा परिणाम होणार नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.