पालघर, ता. १ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेची व्याप्ती तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय या स्तरांवर वाढविण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. या स्पर्धेत नोंदणीकृत तसेच परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सहभागी होऊ शकतात. पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मंडळाला २५ हजार रुपये इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच जिल्हा स्तरावरील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या मंडळांना अनुक्रमे ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपये रकमेचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे.
राज्य स्तरावर प्रथम क्रमांकासाठी सात लाख ५० हजार द्वितीय क्रमांकासाठी पाच आणि तृतीय क्रमांकासाठी दोन लाख ५० हजार रुपये रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी सात लाख ५० हजार तर द्वितीय क्रमांकासाठी पाच लाख व तृतीय क्रमांकासाठी दोन लाख ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी मंडळाचे परीक्षण तालुकास्तरीय समिती सदस्य प्रत्यक्ष येऊन करणार आहेत. जास्तीत जास्त गणेशाेत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.