दिवेआगरमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण
झाडे तोडल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा
श्रीवर्धन, ता. १ (बातमीदार) : दिवेआगर ग्रामपंचायतीच्या नावे असलेल्या शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून तेथील झाडांची तोड केल्याच्या आरोपावरून सहा जणांविरुद्ध दिघी सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडील प्राप्त माहितीनुसार, दिवेआगर ग्रामपंचायतीच्या नावे असलेल्या सरकारी गट क्रमांक ०६६/१/१ मधील सुमारे ५३.३४ आर क्षेत्राच्या जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप आहे. अतिक्रमण करताना या ठिकाणी असलेल्या केतकीच्या व जंगली झाडांची अनधिकृतपणे तोड करून नुकसान करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यात प्लॉटिंग करण्यासाठी दोऱ्या बांधून जागा अडवल्याचा प्रकार केल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकारामुळे शासकीय जमिनीचे नुकसान झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. याप्रकरणी दिघी सागरी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ५० तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ६ जून २०२६ला मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर संबंधित प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीमध्ये दिवेआगर ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या सरकारी जमिनीवरील अतिक्रमण तसेच तेथील झाडांची तोड करून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारीची नोंद २२ जून २०२६ला केल्यानंतर पोलिसांकडून चौकशी केल्यावर २९ ऑगस्टला रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
सहा संशयितांविरुद्ध कारवाई
या प्रकरणात अल्केश अशोक पाटे, मयूर नेयुराम पाटे, सुशांत येणसावरे, संतोष पाटे, योगेश पाटे आणि अमोल बांदे यांची संशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. सध्या कोणालाही अटक झालेली नसून, संशयितांना कलम ३५(३) अन्वये नोटिसा देण्यात आल्या आहेत.
अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
दिवेआगरसारख्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या गावात सरकारी जमिनीवर अनधिकृतपणे ताबा मिळविण्याचा प्रयत्न तसेच त्या ठिकाणी असलेल्या झाडांची तोड झाल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. पोलिस तपासातून संबंधित जमिनीवर नेमके कोणत्या स्वरूपाचे अतिक्रमण करण्यात आले, झाडांची तोड किती प्रमाणात झाली आणि त्यामध्ये महसूल आणि वन विभागाची भूमिका काय होती, हे स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.