जेजेतील १९ सहाय्यक प्राध्यापक सेवामुक्त
पदकपातीवर वैद्यकीय शिक्षक संघटना आक्रमक; फेरनियुक्तीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे. समूह रुग्णालयातील १९ सहाय्यक प्राध्यापकांना सेवामुक्त करण्यात आल्याने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सुधारित आकृतीबंधानुसार राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या किमान मनुष्यबळ निकषांचा आधार घेत काही विभागांतील अध्यापक पदे कमी करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने केला आहे.
या विषयाकडे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून न पाहता जनहित, रुग्णहित आणि वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता लक्षात घेऊन शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत होवाळ आणि सरचिटणीस डॉ. शरद मूलकूटकर यांनी केली आहे.
या निर्णयाचा निषेध करीत सेवामुक्त प्राध्यापकांना तातडीने फेरनियुक्ती देण्याची मागणी संघटनेने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, ॲनाटोमी, फिजिओलॉजी आणि कम्युनिटी मेडिसिन यांसारख्या पायाभूत विभागांतील पदे राष्ट्रीय वैद्यक परिषदेच्या किमान निकषांपुरती मर्यादित करण्यात आली आहेत; मात्र परिषदेचे निकष हे किमान नियामक निकष असून ते एखाद्या मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या कमाल किंवा आदर्श मनुष्यबळाचे प्रमाण दर्शवत नसल्याचा दावा राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनने केला आहे.
जे. जे. समूह रुग्णालयातील मोठा रुग्णभार, उपलब्ध खाटांची संख्या, पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे अध्यापन आणि दैनंदिन रुग्णसेवा लक्षात न घेता केवळ किमान निकषांच्या आधारे अध्यापक पदे कमी करणे चुकीचे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. १९ सहाय्यक प्राध्यापक अचानक सेवेतून कमी झाल्याने रुग्णसेवा, विद्यार्थ्यांचे अध्यापन आणि विभागांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे.
काय आहेत मागण्या?
सेवामुक्त केलेल्या १९ सहाय्यक प्राध्यापकांना तातडीने फेरनियुक्ती देणे, ॲनाटोमी, फिजिओलॉजी व पीएसएम विभागातील रद्द केलेली पदे पूर्ववत करणे, तसेच भविष्यात केवळ परिषदेच्या किमान निकषांच्या आधारे अध्यापक पदांमध्ये कपात करू नये, या प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.